पुणे – विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.1) मतदान होत असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानासाठीचे सर्व कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहचले आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान करता येणार आहे. दरम्यान, पदवीधरसाठी पुणे विभागात 4 लाख 32 हजार, तर शिक्षक मतदारसंघासाठी 74 हजार 860 इतके मतदार आहेत. तर पुणे विभागात मिळून एकूण 1 हजार 202 मतदान केंद्र आहेत.
पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड, तर भाजपकडून संग्राम देशमुख निवडणूक लढवत आहेत. इतर प्रमुख पक्षांचे उमेदवारदेखील या रिंगणात आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 35 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार हे निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, निवडणुकीची मतमोजणी दि. 3 डिसेंबर रोजी होणार आहे.
असे करतात मतदान
पदवीधर मतदार संघासाठी मतपत्रिका पांढऱ्या रंगाची असून शिक्षक मतदार संघासाठी मतपत्रिका गुलाबी रंगाची आहे. मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर चिन्हं छापलेली नसतात. मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत मतपत्रिकेत मतदार पसंती क्रमांक अंकात 1 पासून लिहावयाचा असून ते आकडे मराठी, इंग्रजी, रोमन किंवा भारतीय घटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेतील अंकात लिहिण्यास मुभा आहे, परंतु ते शब्दात लिहिता येणार नाहीत.
मतदान प्रक्रियेसाठी भोरची यंत्रणा सज्ज
भोर – 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी भोर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती तहसीलदार अजित पाटील यांनी दिली. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत भोर, भोलावडे, आंबेघर, नसरापूर व किकवी या पाच ठिकाणी असलेल्या एकूण दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
हे मतदान मतपत्रिकांवर होणार असून जांभळ्या स्केचपेनने पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. पदवीधर करिता 62 व शिक्षक करीता 35 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 70 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यत आली आहे. तालुक्यात 463शिक्षक मतदार तर पदवीधर साठी 1 हजार 860 मतदार आहेत.
मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडा
बारामती -पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक -2020 साठी नियुक्त केलेल्या केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलेली जबाबदारी अत्यंत पारदर्शक पार पाडावी. प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात आली असून सामाजिक अंतर ठेवून मतदान प्रक्रीया पार पाडावी, असे आवाहन बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
मतदान प्रक्रीयेसाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप सोमवारी (दि. 30) कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी तहसीलदार विजय पाटील, बारामती नगरपालिका मुख्याधिकारी किरणराज यादव, निवासी नायब तहसीलदार धंनजय जाधव, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विश्वास ओव्हाळ, सर्व केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.