नगर – माध्यमिक शिक्षकांची कामधेनु असणाऱ्या माध्यमिक शिक्षक सोसायटींच्या 21 जागासाठी उद्या (रविवारी) मतदान होत आहे. 10 हजार 302 मतदार असून यावेळी या निवडणुकीसाठी सत्ताधारी पुरोगामी सहकार आघाडीच्या विरोधात परिवर्तन आघाडीने दंड थोपटले आहे. जनसेवा बहुजन आघाडीनेही तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. या तिरंगी लढतीमुळे माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
21 संचालक मंडळाच्या जागांसाठी 64 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी सहकार आघाडीने गेल्या 17 वर्षापासुन एकहाती सत्ता टिकवून ठेवली आहे. या आघाडीला शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडीने आव्हान दिले असून प्राचार्य सुनील पंडीत, रवींद्र पटेकर, चंद्रकांत चौगुले यांनी जनसेवा बहुजनाच्या माध्यमातून तिसरा पर्याय मैदानात उतरवला आहे.
प्रचाराच्या रणधुमाळीत उमेदवारांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात जाऊन सभा, बैठका, मेळावे घेऊन प्रचार केला. गेल्या 17 वर्षात सत्ताधारी पुरोगामी सहकार आघाडीने केलेल्या कामांची यादीच मतदारांसमोर ठेवली आहे. पारदर्शी कारभारामुळेच 17 वर्षापासून सभासद आमच्या पाठीशी राहिले असे सत्ताधाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पारदर्शी कारभार सुरू असूनही विरोधक केवळ विरोध करण्यासाठी व आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संस्थेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप करत आहेत. तर विरोधी परिवर्तन आघाडीने सत्ताधारी आघाडीने मनमानी कारभार केला असून नोकरभरती, ऑनलाईन प्रक्रिया, जागा खरेदी, बांधकाम, छपाई, संगणक खरेदी यात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.
सत्ताधाऱ्यांनी संस्था स्वतःच्या फायद्यासाठी चालविल्याचा आरोप परिवर्तन आघाडीने केला आहे. तर सत्ताधारी आणि विरोधक हे एकाच नाण्याचा दोन बाजू असून जनसेवा बहुजन विकास आघाडीने मतदारांसमोर समक्ष पर्याय ठेवला असल्याचा दावा या तिसऱ्या आघाडीकडून करण्यात येत आहे. नगर शहरातील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलमध्ये पाच मतदान केंद्र आहेत. मतमोजणी सोमवारी ओम गार्डन येथे सकाळी 10 वाजेपासून होणार आहे.