राहुरी – तालुक्यातील मालुंजे खुर्द येथे चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर महसूल विभागाने कारवाई करून तो जप्त केला असताना रविंद्र धनवटे या वाळू तस्कराने वाळूने भरलेला टेम्पो पळवून नेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा धनवटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास राहुरी येथील तहसीलदार फसिओद्दीन शेख तालुक्यातील मालुंजे खुर्द येथे गस्त घालत असताना त्यांना प्रवरा नदी पात्रात (एमएच. 20 एजी 2470) हा टेम्पो शासनाच्या मालकीच्या वाळूचे उत्खनन करून चोरून नेत असताना दिसला. यावेळी टेम्पोवर कारवाई करून टेम्पो चालकासह ताब्यात घेतला. टेम्पो राहुरी पोलीस ठाण्यात आणत असताना टेम्पो मालक रविंद्र धनवटे व एका अनोळखी चालकाने पाथरे खुर्द रस्त्याने टेम्पो वाळूसह पळवून नेला. सरकारी कामात अडथळा आणला.
या घटनेबाबत तहसीलदार मोहम्मद फसिओद्दीन रफिउद्दीन शेख यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो मालक रविंद्र धनवटे व एक अनोळखी टेम्पो चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंत राक्षे हे करित आहे.
तर या घटनेतील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. राहुरी शहरातील नावघाट, गणपती घाट आदि भागात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. रात्रीच्या वेळी ही वाळू तस्करी सुरू असल्याने वाहनांच्या कर्ण कर्कश आवाजाने शहरातील नागरीकांची झोप मोड होत आहे. कोणी काही बोलले तर वाळू तस्कर त्यांना दमदाटी करून दहशत करतात. या वाळू तस्करांची चांगलीच मुजोरी वाढली आहे. अनेक वेळा महसूल कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत.