वाघोली- पुणे महानगरपालिकेत वाघोलीचा समावेश करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली असताना शासनाने ग्रामसभेचे/ नागरिकांचे म्हणणे एकूण घेऊन अहवाल पाठविण्याचे कळविले असताना वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी तातडीने झूम मिटिंगद्वारे ऑनलाईन सभा बोलाविली होती.
यामध्ये जवळपास ९५ टक्के नागरिकांनी समावेशाला सहमती दर्शविली असून इतरांनी महापालिकेच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून नकार दर्शविला आहे. ऑनलाईन सभेसह गुगल फॉर्मद्वारेही नागरिकांची मते नोंदवून घेतली जात आहेत.
वाघोलीसह २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याची अधिसूचना डिसेंबर २०२० मध्ये शासनाने काढली. त्यानंतर २२ जानेवारी पर्यंत समावेशाबाबत हरकती व सूचना मागविल्या.
हरकती व सूचनांवर एप्रिल महिन्यात सुनावणी घेण्यात आली. त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यकारी मंडळानेदेखील समावेशाबाबत कळविले होते.
शासनाने ग्रामसभेचे/नागरिकांचे म्हणणे सादर करण्यासंदर्भात कळविल्यानंतर कोरोना परिस्थिती असल्याने वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने तात्काळ सरपंच वसुंधरा उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झूम मिटिंगद्वारे ऑनलाईन सभा बोलाविण्यात आली.
यावेळी जवळपास ९५ टक्के नागरिकांनी विकासात्मक दृष्टीकोन व मुलभूत सोयीसुविधांसाठी समावेश करावा असे मत व्यक्त केले तर इतर नागरिकांनी महापालिकेची सध्याची असणारी कमकुवत आर्थिक परिस्थिती, अगोरदच्या गावात रखडलेली विकासकामे, समावेश करावा पण ३ ते ५ वर्षाच्या कालावधीनंतर करावा अशा भूमिका मांडून विरोध दर्शविला आहे.
गुगल फॉर्मद्वारेही आत्तापर्यंत जवळपास १८०० नागरिकांनी मते नोंदविली असून ऑनलाईन सभा व गुगल फॉर्मद्वारे नोंदविलेल्या मतांचा अहवाल शासनाला तात्काळ पाठविला जाणार आहे.
शिवदास उबाळे। माजी सरपंच, ग्रामपंचायत वाघोली