बेंगळुरू – अंमलीपदार्थांच्या प्रकरणात बेंगळुरू पोलिसांनी आज हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या घराची झडती घेतली. या प्रकरणाशी संबंधित आणि विवेक ओबेरॉयचा मेव्हणा आदित्य अल्वा याच्या शोधासाठी पोलिसांनी हापा घातला होता. आदित्य अल्वा हा ड्रग्ज प्रकरणातील वॉन्टेड आहे, असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.
आदित्य अल्वा हा विवेक ओबेरॉयचा नातेवाईक आहे आणि तो विवेकच्या घरी असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे गुन्हे शाखेने न्यायालयाकडून “सर्च वॉरंट’ मिळवले आणि विवेकच्या घराची झडती घेतली, असे अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.
आदित्य अल्वा हा माजी मंत्री दिवंगत जीवराज अल्वा यांचा पुत्र आहे. अंमलीपदार्थांच्या व्यवहारांबाबत पोलिसांनी गेल्या महिन्यापासून जोरदार मोहीम सुरू केली आहे. तेव्हापासून तो फरार आहे.
अंमलीपदार्थांच्या व्यवहारांशी संबंधित आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये कन्नड अभिनेत्री रागिणी द्विवेदी, संजना गलराणी, रेव्ह पार्टी आयोजक विरेन खन्ना, रिऍल्टी व्यावसायिक राहुल आणि काही नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे.