पुणे – श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी काळात भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारकऱ्यांची सेवा करता येणार आहे. पूर्णपणे विनामोबदला ही सेवा असेल. यात प्रामुख्याने मंदिर आणि इतर इमारतीत स्वच्छता करणे, दर्शनरांग पुढे सरकवण्यास मदत, भोजनप्रसाद वाटप, गोशाळेत स्वच्छता, चहा-पाणी वाटप, निर्माल्य उचलणे ही सेवा करण्याची संधी देण्यासाठी “विठ्ठल सेवक’ योजना राबवण्यात येत आहे.,
या योजनेमध्ये सात व्यक्तींचा एक गट तयार करण्यात आला असून, रविवार ते शनिवार एक गट काम करेल. असे एका आठवड्यात सकाळी 6 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 10, रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत आठवडाभर सेवा देतील. तसेच एका सेवकाला एकापेक्षा अधिक गटांमध्ये नोंदणी करता येणार आहे. अशा गटांना मंदिर समितीच्या विविध ठिकाणी सेवेची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून काही गटांना वर्षातून एका पेक्षा जास्त वेळा सेवेची इच्छा असेल, तर त्यांना वर्षातून एका पेक्षा जास्त वेळेस सलग 7 दिवस सेवेची संधी देण्यात येणार आहे.
या सेवकांची भोजन व निवास व्यवस्था मंदिर समितीमार्फत मोफत करण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र शेगाव आणि श्रीक्षेत्र शिर्डी देवस्थानांनी असा उपक्रम सुरू केला असून, तसाच प्रयत्न आता पंढरपूर येथे करण्यात येत आहे.
कोठे करावा अर्ज
या सेवा योजनेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी मंदिर समिती कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत असे आवाहन श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांनी केले आहे. सदर योजनेच्या अटी, शर्ती, माहिती व अर्जाचा नमुना मंदिर समितीच्या https://www.vitthalrukminimandir.org/ या संकेतस्थळावर आणि श्रीसंत तुकाराम भवन, पंढरपूर येथील कार्यालयात उपलब्ध आहे.
गैरवर्तन केल्यास थेट पोलिसांत तक्रार
एखाद्या सेवकाने काही गैरवर्तन केल्यास किंवा बुवाबाजी, भोंदुगिरी करत अंधश्रद्धेला खतपाणी घातल्यास त्याच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिवाय, एखाद्याने दर्शनरांग तोडून आपल्या ओळखीच्या व्यक्तींना दर्शनास नेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला या सेवेतून कमी करण्यात येणार आहे.