पुणे – विश्वनाथ स्पोर्ट मीट या राज्यस्थरिय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करताना तब्बल २० सुवर्ण व १७ रौप्यपदकांसह स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. एमआयटी एडीटी पाठोपाठ एमआयटी डब्लूपीयू संघाने एकूण १६ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह दुसरा तर बीजेएस वाघोली संघाने ३ सुवर्ण व २ रौप्यपदकांसह स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला.
राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोड, साईचे प्रादेशिक संचालक पांडूरंग चाटे, माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डाॅ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु व कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या प्रमुख उपस्थिती उद्धाटन झालेल्या या स्पर्धेत १५ क्रीडा प्रकारांत १४०हून अधिक शिक्षण संस्थांमधील ५००० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. बॅडमिंटनच्या महिला व पुरुष प्रकारांच्या अंतिम सामन्यात एमआयटी एडीटीच्या खेळाडूंचा पराभव करत कोथरूडच्या एमआयटी डब्लूपीयूने सुवर्ण कामगिरी केली. बुद्धिबळातील एमआयटी डब्लूपीयूचा वरचष्मा पहायला मिळाला. कारण पुरुषांत त्यांनी व्हीआयटीचा तर महिलांत एमआयटी एडीटीचा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. बास्केटबाॅलच्या अंतिम सामन्यांतही डब्लूपीयू संघाने मुंबईच्या एसएमएमके संघाचा ५७-४१ अशा फरकाने धूव्वा उडवला तर महिलांत डब्लूपीयूने एमआयटी एडीटीचा ५२-४६ अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक सोबत नेले.
स्पर्धेत सर्वांत रोमांचक ठरलेल्या व एकूण ३६ संघांमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद यजमान एमआयटी एडीटीच्या पुरुष संघाने पटकाविले. यात वेदांत कनोजीयाला सर्वोत्कृष्ट फलंदाज तर स्वामाभू स्वामीला सर्वोत्तम गोलंदाजाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात एनडीए खडकवासलाने संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूरला ५-२ अशा फरकाने पराभूत केले. तर महिलांत एमआयटी डब्लूपीयूने एमआयटी एडीटी संघाचा ३-१ अशा फरकाने पराभव केला.
IND vs ENG 2nd Test : पराभवानंतरही इंग्लंडच्या नावे झाली एका ‘मोठ्या’ विक्रमाची नोंद…
कबड्डी, टेबल टेनिससह अन्य खेळातही वर्चस्व
कबड्डीत विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय बारामती व एमईएस गरवारे महाविद्यालय, पुणे यांनी जेतेपद पटकाविले. अत्यंत रोमांचक ठरलेल्या खो-खोच्या अंतिम सामन्यात गणपतराव काळभोर महाविद्यालय व विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाने सुवर्णपदक जिंकले. स्पर्धेच्या अन्य टेबल-टेनिस, टेनिस, व्हाॅलीबाॅल व वाॅटर पोलो या खेळांतही एमआयटी शिक्षण समुहांच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले. स्पर्धेचे बक्षिस वितरण सर्वांत तरुण महिला एव्हरेस्टवीर पुर्णा मालवत, मेजर ध्यानचंद पुरस्कार प्राप्त खेळाडू कॅप्टन राजेंद्र शेळके, एमआयटी एडीटी मिटकाॅमच्या संचालिका डाॅ.सुनिता कराड, विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक प्रा.पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयार आदी पाहुण्यांच्या हजेरीत पार पडले.