विशाल भालेराव
खडकवासला – सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौकापर्यंतच्या डीपी रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन या ३० मीटर डीपी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ३५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती पालिकेच्या पथविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हा डीपी रस्ता तात्काळ सुरू करण्यासाठी सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे, आम आदमी पार्टीचे धनंजय बेनकर, यशवंत लायगुडे, शेतकरी सतीश चाकणकर आदी उपस्थित होते.
गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या डीपी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी जागा देण्यासाठी सहमती दर्शवल्यामुळे डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या जो निधी उपलब्ध आहे त्यात मार्चपर्यंत काम करण्यात येणार असून पुढील चालू वर्षात निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वडगाव खुर्द ते सावित्री गार्डन हा ३० मीटरचा डीपी रस्ता विकसित झाल्यानंतर धायरी आणि डीएसके विश्व परिसरातील हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे.