नवी दिल्ली – धोनीच्या निवृत्तीवरुन सुरु असलेले कवित्व संपत नाही तोच आता विराट कोहलीलाही निवृत्ती कधी घेणार असले अर्थहीन प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारले जात आहेत. पूर्ण क्षमतेने माझा खेळ होत नाही, तसेच तंदुरुस्तीही कमी झाली असे जेव्हा मला लक्षात येईल त्यादिवशी मी स्वतःहून निवृत्ती पत्करीन अशा शब्दात कोहलीने प्रश्नकर्त्याला फटकारले आहे.
ट्विटरवरील एका चॅट दरम्यान इंग्लंडचा माजी कसोटीपटू केविन पिटरसन याने कोहलीवर प्रश्नांची सरबत्ती केली असून त्यात त्याच्या निवृत्तीबाबतही प्रश्न विचारला होता. त्यावर कोहलीने हे उत्तर दिले. भारतीय संघाची कामगिरी, तसेच खेळाडूंना सातत्याने होत असलेल्या दुखापती व भविष्यातील आव्हाने यांबाबत पिटरसनने विचारलेल्या सर्व प्रश्नांवर कोहलीने चांगलीच टोलेबाजी केली. कोहलीच्या या उत्तरांनी नेटकरी लोकांची चांगलीच करमणूक झाली.
एकीकडे आयपीएल होईल का नाही असे चित्र स्पष्ट असताना आगामी मालिकांबाबत पिटरसनशी बोलताना कोहलीने अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यातच निवृत्तीच्या प्रश्नावर देखील कोहली बोलुन गेला. प्रत्येक सामन्यात मी क्षमतेपेक्षाही जास्त देण्याचा प्रयत्न करत असतो. वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाचा विजय माझ्यासाठी महत्वाचा आहे. मी क्षमतेपेक्षा जास्त देऊ शकत नाही तसेच माझी तंदुरुस्तीही कमी झाली आहे, असे जेव्हा मला मनापासून वाटेल त्यादिवशी मी निवृत्ती जाहीर करेन, असे सांगून कोहलीने पिटरसनचीही बोलती बंद केली.
क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून मला कधीच निराशा आली नाही. काहीवेळा माझी कामगिरी चांगली झाली नाही. नेटमध्ये माझा खेळ चांगला होत होता मात्र प्रत्यक्ष सामन्यात माझ्याकडून चुका होत होत्या. क्रिकेट खेळताना ज्या दिवशी मला आनंद मिळणे बंद होईल तेव्हा मी समजेन की माझ्या निवृत्तीची हीच वेळ योग्य आहे, असेही कोहलीने स्पष्ट केले.