क्रिकेट काॅर्नर : प्रतिष्ठा जपण्यासाठी खेळ व्हावा

– अमित डोंगरे

विराट कोहलीचा संघ इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ट्रेंटब्रीज मैदानावर उतरला. या मालिकेत सहभागी होताना गतवेळी काय झाले होते याचे दडपण मनावर घेण्यापेक्षा यंदा काय व्हावे तसेच कसा खेळ करावा आणि जबाबदारी म्हणजे काय ते ओळखून प्रतिष्ठा जपण्यासाठी कोहलीच्या संघाने खेळ केला पाहिजे.

आपला संघ ज्या ज्या वेळी परदेशात मालिका खेळण्यासाठी जातो, त्यावेळी त्यांची गतकाळातील कामगिरी कशी झाली याचे दडपण खेळाडूंवर असते. त्यातच इंग्लंड काय किंवा ऑस्ट्रेलिया काय मीडिया स्ट्रॅटेजीचा उदो उदो करत प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणतात व त्याखाली संघ दबून जातो व पराभूत होतो. यंदा कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला हा अपयशाचा इतिहास पुसून काढण्यासाठी भूतकाळाला विसरून वर्तमानात जगावे लागेल.

भारतातीलच नव्हे जगभरातील क्रिकेट समीक्षक कोहलीच्या संघाचे समीक्षण करण्यासाठी सज्ज आहेतच, त्यामुळे त्यांना काय वाट्टेल ते बरळू देत आपण बरे व आपली कामगिरी बरी हाच उद्देश असला पाहिजे. गेल्या मालिकेत कोहलीने सर्वाधिक धावा केल्या होत्या. यंदा तो काय करणार या प्रश्‍नांना मालिकेपूर्वीच सुरुवात झाली आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये असे काही क्रिकेटपटू आहेत की, ज्यांनी स्वतःच्या कारकिर्दीत काय दिवे लावले आहेत ते संपूर्ण क्रिकेटविश्‍वाला माहीत आहे, पण तरीही त्यांना परवाना मिळाल्यासारखे प्रत्येक वेळी भारतीय संघाच्या कामगिरीची चिरफाड करत असतात. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. यातील काही खेळाडू स्वतःला समीक्षक समजतात. आता त्यांना काय ते समजू देत, पण सध्या कोहलीच्या संघाने खेळपट्टीवर नांगर टाकून उभे राहात यजमानांसमोर मोठी धावसंख्या उभारण्याकडे लक्ष द्यावे.

माजी कर्णधार व बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याप्रमाणे कोहलीनेदेखील मालिका सुरू आहे तोपर्यंत विविध वाहिन्यांवर समीक्षकांकडून लावले जाणारे दिवे यांकडे लक्ष देऊ नये. सोशल मीडियापासून अंतर ठेवले तर भारतीय संघाची कामगिरी निश्‍चितच कौतुकास्पद होईल यात शंका नाही. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच कोहली, अजिंक्‍य रहाणे, चेतेश्‍वर पुजारा, रोहित शर्मा यांनी काय करावे व काय करू नये याचे गणितही मांडले जाऊ लागले आहे.

काही वाहिन्यांवर ही चर्चा घडवून आणण्यात धन्यता मानली जाते व त्यात मत व्यक्‍त केले नाही तर आपल्याला दंड केला जाईल की काय, अशा थाटात सोकॉल्ड समीक्षक सज्जच असतात. त्यांच्या अंदाजपंचे दाहोदरसेच्या नादी लागण्यापेक्षा आपल्या कामगिरीकडे लक्ष द्यावे व परदेशातही प्रतिष्ठा जपण्यासाठी खेळावे, हीच काय ती अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.