Virat Kohli – भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की, सर्व जगभरातील क्रिकेट चाहते तो पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्याचप्रमाणे टी-२० विश्वचषक २०२२मधील भारत-पाकिस्तान सामना लाखो चाहत्यांच्या कायम आठवणीत राहणार आहे. त्याचबरोबर या सामन्यात हरिस रौफच्या चेंडूवर विराट कोहलीने स्ट्रेटला मारलेल्या षटकाराची आतापर्यंत चर्चा सुरु आहे. ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगनेही विराट कोहलीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात विराटचा तो षटकार कायम स्मरणात राहील, असे पाँटिंग म्हणाला.
“सूर्यकुमार यादव हा जागतिक क्रिकेटचा नवा मिस्टर 360 डिग्री खेळाडू”, सुनील गावस्कर यांचं वक्तव्य!
पाँटिंग म्हणाला की, कदाचित कोहलीच्या ( Virat Kohli ) कारकिर्दीतील सर्वच षटकारांमध्ये हॅरिस रौफच्या वेगवान गोलंदाजीवर मारलेल्या त्या षटकाराबाबत सर्वाधिक बोलले जाईल. विराटने तो मारलेला षटकार खरंच अविश्वसनीय असाच होता. कारण एखाद्या वेगवान गोलंदाजाला उसळत्या खेळपट्टीवर जागेवर उभा राहून बॅकफूटवरून स्ट्रेटला षटकार मारणे सोपे नाही. हा षटकार मारताना विराट कोहलीने त्याच्या कौशल्याचा आणि ताकदीचा योग्य वापर केला, असेही पॉंटिंगने म्हटले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे संपूर्ण श्रेय विराट कोहलीला ( Virat Kohli ) जाते. कारण कोहलीने नाबाद ८२ धावांची खेळी करत भारताला अडचणीतून विजयाकडे नेले होते. त्याने शेवटच्या तीन षटकात भारताला ४८ धावांची आवश्यकता असताना हुशारीने फलंदाजी करत रोमहर्षक विजय मिळवून दिला. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापासूनच विराटने त्याचे इरादे स्पष्ट केले आहेत. त्याने मागील ५ सामन्यात २४६ धावा केल्या असून यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे.