Suryakumar Yadav – भारताचा माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी सूर्यकुमार यादवबाबत एक मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी सूर्यकुमार यादवचे जागतिक क्रिकेटचा नवीन मिस्टर 360 डिग्री असे वर्णन केले आहे. जर एखाद्या सामन्यात सूर्यकुमार धावा करण्यात अपयशी ठरला तर भारत संघ अडचणीत येऊ शकतो, असेही गावस्कर यांनी म्हटले आहे. सूर्यकुमारने नुकतेच आयसीसीच्या जागतिक टी-२० क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत २५ चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या होत्या.
#T20WorldCup2022 | भारत-इंग्लंड सेमीफायनल मॅचसाठी अम्पायर्सची नावे जाहीर; चाहत्यांची चिंता वाढली!
गावस्कर म्हणाले की, “सूर्यकुमारने ( Suryakumar Yadav ) प्रत्येक सामन्यात फलंदाजी करताना मैदानात चौफेर धावा केल्या आहेत. तो जागतिक क्रिकेटचा नवीन मिस्टर 360 डिग्री आहे. त्याच्या प्रत्येक शॉट्समध्ये वेगळेपणा पाहायला मिळतो. किंबहुना, तो असा खेळाडू बनत आहे जो संघाला अडचणीत योग्य प्रकारे बाहेर काढू शकतो. त्यामुळे आता पुढील सेमीफायनल सामन्यात सूर्यकुमारच्या खांद्यावर जास्त जबाबदारी असणार आहे.”
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादववर ( Suryakumar Yadav ) जास्त प्रमाणात अवलंबून न राहता सलामी जोडीला धावा करणे गरजेचे आहे. कारण मागील काही सामन्यांमध्ये फलंदाजीत विराट किंवा सूर्यकुमार असे दोनच खेळाडू जास्त चमकले आहेत. त्यामुळे इंग्लडविरुद्धच्या सामन्यात भारताला विजय मिळवायचा असेल तर सलामीला कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी मोठी खेळी करणे अत्यंत गरजेचे आहे. टी-२० विश्वचषकात सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली चांगल्याच लयीत आहेत. स्पर्धेत विराट कोहलीने सर्वाधिक २४६ धावा तर सूर्यकुमार यादवने २२५ धाव केल्या आहेत.