मेलर्बन – क्रिकेट विश्वात सध्या विराट कोहली हा सर्वाधिक शक्तिशाली क्रिकेटपटू आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर याने व्यक्त केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यातील पहिला सामना डे-नाईट खेळण्यात येणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाबरोबर डे-नाईट टेस्ट खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यानंतर विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतणार आहे.
विराटची स्तुती करताना मार्क टेलर म्हणाला, विश्व क्रिकेटमध्ये सध्या विराट हाच खूप सामर्थ्यवान खेळाडू आहे. तो एक आक्रमक खेळाडू असून संघाचे नेतृत्त्व करताना योग्य संतुलन साधतो. आतापर्यतची त्याची कामगिरीही उत्तम राहिलेली आहे. मला वाटते की त्याने आपली जबाबदारी अतिशय सम्मानपूर्वक पार पाडली आहे. आताही तोच विराट कोहली आहे, हे आपल्याला त्याच्या खेळावरून दिसून येते. तसेच मी जेव्हा-जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा मला असे जाणवले की, तो या खेळाचा खूप आदर करतो. इतकेच नव्हे तो आजी-माजी खेळाडूंचाही सम्मान राखतो, असे मार्क टेलर म्हणाले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनीही नुकतेच कोहलीचे कौतुक केले होते. लॅंगर म्हणाले होते की, मी आजपर्यत आयुष्यात पाहिलेल्या सर्व खेळाडूंपैकी तो एक सर्वोत्तम खेळाडू आहेत. हे फक्त त्याच्या फलंदाजीबद्दलच नसून त्याची खेळाबद्दलची इच्छा आणि उर्जा पाहण्यासारखी आहे. विशेषत: ज्या प्रकारे तो क्षेत्ररक्षणात स्वतःला झोकून देतो, असे लॅंगर म्हणाले होते.