नवी दिल्ली – धावांचा भुकेला, सातत्यपूर्ण फलंदाज, भारतीय फलंदाजीचा कणा, रनमशीन अशा विविध नावांनी गौरविण्यात येत असलेल्या कर्णधार विराट कोहली याला कसोटी मालिकेत अपयशाचा धनी व्हावे लागले. त्याच्या बॅटमधून पूर्वीसारख्या धावा निघाल्या नाहीत. इथेच भारतीय संघाचा पराभव झाला.
कसोटी मालिकाच नव्हे तर टी-20, एकदिवसीय आणि कसोटी या पूर्ण न्यूझीलंड दौऱ्यात कोहलीने केवळ एकच अर्धशतकी खेळी केली आहे. गेल्या 21 डावांत कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक फटकावलेले नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोहलीने 21 धावा केल्या होत्या. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 75 तर 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 105 धावा कोहलीच्या नावावर आहेत. गेल्या 21 डावात एकही शतकी खेळी त्याला करता आलेली नाही. या आधी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध 136 धावांची खेळी केली होती.