चेन्नई – भारतीय संघाचा माजी कर्णधार बेस्ट फिनिशर महेंद्रसिंग धोनी याचा महिमा कायम असल्याचे सोमवारी येथील विमानतळावर दिसले. अनेक महिन्यांनी मैदानावर उतरण्यासाठी व सराव सत्रात सहभागी होण्यासाठी धोनी येथे दाखल झाला व त्याला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने चाहते जमा झाले होते.
THALA DHARISANAM! #WhistlePodu ?? pic.twitter.com/fb7TCiuqHL
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 1, 2020
इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढतीत झालेल्या भारताच्या पराभवानंतर धोनीने क्रिकेमधून विश्रांती घेतली होती. आता मात्र येत्या 29 मार्चपासून सुरु होत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपरसिंगकडून सहभागी होण्यासाठी धोनी येथे दाखल झाला आहे व पुन्हा एकदा क्रिकेटचा श्रीगणेशा करण्यासाठी सज्ज बनला आहे.
यंदाच्या आपयीएलमधील सलामीचा सामना धोनीच्या चेन्नई व मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई संघाचा सराव सुरु झाला आहे, त्यात धोनीने मंगळवारपासून सहभाग घेतला. त्याची मैदानावरची एंट्री तसेच सरावातील फलंदाजी पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. धोनीनेही त्यांना निराश केले नाही. धोनीने नेटमध्ये आक्रमक फटकेबाजी करताना चौकार व षटकारांची आतषबाजी केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व नेटकऱ्यांनी अभिनंदनाच्या पोस्ट केल्या.
धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते, व अनेकांनी याबाबत तारे तोडले होते. या चर्चांना पूर्णविराम देत धोनी मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संघात पुनरागमन करण्याच्या इर्षेने धोनी आयपीएलमध्ये सहभागी होत असून त्याची कामगिरीच त्याचे संघातील स्थान ठरविणार आहे.