नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांची हत्या केल्याच्या आरोपावरून सध्या जन्मठेप भोगत असलेला भाजपाचा निलंबित आमदार कुलदीपसिंह सेंगर याच्यासह अन्य सहा आरोपींना दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने दोषी ठरवले. तर या प्रकरणात चार अन्य आरोपींची सुटका करण्यात आली.
एका अल्पवयीन मुलीवर 2017 मध्ये बलात्कार केल्याच्या आरोपावरून सेंगरला गेल्या महिन्यात जन्मठेप ठोठावण्यात आली होती. त्याच्याविरूध्द फिर्याद दाखल केल्यानंतर तिच्या वडिलांना बेदम मारहाण केली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सीबीआयच्या वतीने 55 साक्षीदार तपासण्यात आले होते. पीडितेचे काका, आई, बहीण आणि वडिलांचे सहकारी यांचे जबाब न्यायलयाने नोंदवून घेतले होते.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, तीन एप्रिल 2081 ला शिवप्रतापसिंह यांच्याशी पीडितेच्या वडिलांचे वाद झाले होते. 13 जुलै 2018ला दाखल केलेल्या आरोपपत्रात पीडितेचे वडील आणि त्यांचे सहकारी कामावरून माखी या गावी परत येत असताना त्यांनी सिंहकडे लिफ्ट मागितली. त्याने त्यास नकार दिला. त्यावेळी दोघांच्यात वाद झाला. त्यावेळी सिंहने त्याच्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यावेळी सेंगरचा भाऊ अतुलसिंह आपल्या साथिदारांसह आला. त्याने पीडितेचे वडील आणि त्यांच्या सहकाऱ्याला मारहाण केली. त्यानंतर पीडितेच्या वडिलांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली.
या काळात कुलदीप सेंगर जिल्हा पोलिस अधिक्षक आणि माखी पोलिस ठाण्याचे प्रमुख अशोकसिंह बहादौरिया यांच्या संपर्कात होता. त्यानंतर त्याने पीडितेच्या वडिलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधला होता. या प्रकरणात सेंगर, त्यांचा भाऊ अतूल, बहादौरिया, उपनिरीक्षक कामता प्रसाद, हवालदार अमिर खान आणि अन्य सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक ऑगस्टला दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आला होता.