सर्वात यशस्वी कर्णधार होण्याचा पटाकवला मान
नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिकेत विडिंजचा पराभव केला आहे. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारताने विडिंजच्या संघावर कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व मिळवले. या विजयासोबतच विराट कोहली भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार झाला आहे. विराट कोहलीने माजी कर्णधार एम. एस धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा 28 वा विजय आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 27 कसोटी सामने जिंकले होते.
माजी कर्णधार धोनीने 60 कसोटी सामन्यात भारताला 27 सामने जिंकून दिले होते. कोहलीने 48 व्या सामन्यात 28 वा विजय साजरा करत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट कोहली आशिया खंडातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. याशिवाय 48 सामन्यात सर्वात कमी पराभाव विराट कोहलीने पाहिले आहेत. कर्णधार म्हणून कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत फक्त दहा सामने गमावले आहेत. 2014 मध्ये विराट कोहलीने भारतीय संघाची सुत्रे सांभाळली होती. या विजयासह भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकूण 120 गुण झाले आहेत. गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे. विराटसेनेचा विंडीज दौरा यशस्वी संपला आहे. 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकामध्ये टी-20 आणि कसोटी मालिका होणार आहे.