“दिल्लीतील हिंसा सुनियोजित, अमित शहांनी राजीनामा द्यावा”

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या हिंसाचारावरून आता आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहे.

शेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत सुनियोजित हिंसा घडवण्यात आली आहे. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच जबाबदार असून त्यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे.

शेतकरी आंदोलनाच्या आडून सुनियोजित हिंसा भडकवली गेली आहे. त्याला अमित शहा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना एकक्षणही पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. दिल्लीतील हिंसा ही गंभीर बाब आहे. हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन शहा यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा मोदीही शहा यांना मिळालेले असल्याचं सिद्ध होईल, असं सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

दरम्यान दीप सिद्धू आणि त्यांचे सहकारी लाल किल्ल्यात दाखल झाले होते. याच सिद्धूने पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसोबतचे फोटो सार्वजनिक केले आहेत. लाल किल्ल्यावर झेंडा फडकावून शेतकऱ्यांना भडकावणाऱ्या सिद्धूला अटक का करण्यात आली नाही ? असा सवालही सुरजेवाला यांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.