कोलकाता – बंगालच्या कूचबिहार लोकसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीचे दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांचा फासावर लटकवलेला मृतदेह आढळला आहे. पक्ष कार्यालयाच्या जवळच त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. ही एकप्रकारे अमित सरकार यांची पूर्व नियोजित हत्याच आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात येतो आहे.
भाजपने या प्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा सध्या बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी विशेष पोलीस पर्यवेक्षकाकडे संपूर्ण घटनेचा अहवाल मागितला आहे.
दरम्यान, भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी या घटनेवरुन तृणमूलवर निशाणा साधला आहे. विजयवर्गीय यांनी ट्विटरवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. दीदीचा खेळ सुरु, ममता सरकारच्या राजनैतिक हिंसाचाराचा अंत अजूनही झालेला नाही.
कूचबिहार लोकसभा क्षेत्रातील दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांना टीएमसीच्या गुंडांनी फाशीवर लटकवले. राज्यात आतापर्यंत 130 पेक्षा जास्त भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार आहे, असा आरोप विजयवर्गीय यांनी केलाय.