पुणे जिल्हा: एसटीचे सीमोल्लंघन…

पुणे – करोना पार्श्‍वभूमीवर बंद असणाऱ्या एसटीची आंतरराज्य सेवा पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी ई-पासची आवश्‍यकता नाही. 16 सप्टेंबरपासून पुणे विभागातून पणजी आणि सुरत या मार्गांवर फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या फेऱ्यांना स्थगिती दिली होती. आता अनलॉकमध्ये जिल्हा, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासी वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. बसेस 50 टक्‍के क्षमतेने सोडण्यात येणार आहेत.

16 सप्टेंबरपासून पुणे विभागांतर्गत वाकडेवाडी बसस्थानकातून पणजी आणि सुरत या आंतरराज्य मार्गांवर फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.

शिवाजीनगर-पणजी मार्गावर जाताना सकाळी 5.30 वाजता आणि येताना सकाळी 10 वाजता या वेळात साधी शयनयान गाडी धावणार आहेत. तर शिवाजीनगर-सुरत मार्गावर सकाळी 8 वाजता आणि येताना सकाळी 7.30 वाजता निमआराम गाडी धावणार आहे.

या दोन्ही गाड्यांसाठी आगाऊ आरक्षण सुरू झाले आहे. या फेऱ्यांच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली नसून, जुन्या दराप्रमाणेच शिवाजीनगर-पणजी या फेरीसाठी 795 रुपये आणि शिवाजीनगर-सुरतसाठी 645 रुपये दर आकारण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.