कोलकता – केंद्रीय योजनांच्या जाहिराती आणि करोना लसीकरण प्रमाणपत्रांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावर तृणमूल कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. मोदींच्या छायाचित्राचा वापर निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारा असल्याची तक्रार त्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे तेथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच बंगालमधील सत्तारूढ तृणमूलच्या शिष्टमंडळाने बुधवारी येथे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मोदींचे छायाचित्र असणाऱ्या केंद्रीय योजनांच्या जाहिरातींचे फलक पेट्रोल पंपांवर झळकत आहेत. ते फलक हटवण्यात यावेत, अशी मागणी त्या शिष्टमंडळाने केली.
मोदी भाजपचे स्टार प्रचारक असतील. एक राजकीय नेता म्हणून ते प्रचारावेळी त्यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन करतील. त्यामुळे लसीकरण प्रमाणपत्रांवरील त्यांच्या छायाचित्राचा वापर मतदारांवर प्रभाव टाकणारा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणारा ठरेल, अशी भूमिकाही तृणमूलकडून मांडण्यात आली. ती भूमिका खोडून काढण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. लसीकरण मोहीम निवडणूक जाहीर होण्याआधीच सुरू झाली. पेट्रोल पंपांवर लावण्यात आलेले फलक कल्याणकारी योजनांशी संबंधित आहेत. ते खासगी जागेवर उभारण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.