संघ आणि मदरसा तुलनेवर जावडेकरांची प्रतिक्रीया; म्हणाले, “राहुल गांधींना संघ समजण्यास…”

नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चालवलेल्या शिशु मंदिर शाळा आणि पाकिस्तानात इस्लामिक कट्टरपंथीयांनी चालवलेले मदरसे यात काहीहीं फरक नाही असे विधान काल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत केले होते. त्यावरून आज भाजपने त्यांच्यावर पलटवार केला आहे.

या संबंधात प्रतिक्रीया देताना भाजप नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमका काय आहे हे समजायला राहुल गांधी यांना बराच वेळ लागेल. संघ ही राष्ट्रवादाची सर्वात मोठी शाळा आहे. तेथे मानवतावाद आणि सामाजिक मुल्ये शिकवली जातात. 

काल राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, संघाच्या शाळांमधून उच्च शिक्षण संस्थांवर टीका केली जाते. संघाच्या शाळा आणि पाकिस्तानातील इस्लामिक कट्टरपंथीयांचे मदरसे यात मला काहींच फरक दिसत नाही असे त्यांनी म्हटले होते. 

संघाच्या शाळांमध्येही प्रश्‍न विचारण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारच्या शेकडो शाळा चालवण्यासाठी संघाच्या लोकांकडे पैसा कोठून येतो असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर जावडेकर यांनी हे प्रतिपादन केले.

आणीबाणीच्या काळात लोकशाही संस्थांवर हल्ले झाले नव्हते असे जे विधान राहुल गांधी यांनी केले आहे त्यावरही जावडेकर यांनी टीका केली आहे. त्यांचे हे विधान हास्यास्पद आहे असे जावडेकर यांनी म्हटले आहे. आणीबाणीच्या काळात सर्व संस्था गलितगात्र करण्यात आल्या होत्या.

अनेक खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींना अटक करण्यात आली होती. राजकीय पक्ष आणि प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्यही काढून घेण्यात आले होते असे जावडेकर यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.