जेनिफर आणि ऍडमचा नेटफ्लिक्‍सवर विक्रम

“नेटफ्लिक्‍स’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एखादा चित्रपट किंवा सीरिज लोकांकडून सर्वाधिक पाहिली गेली असल्यास नेटफ्लिक्‍स त्याचा आकडा जाहीर करते. आठवड्याभरापूर्वीच “मर्डर मिस्ट्री’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जेनिफर ऍनिस्टन व ऍडम सॅंडलर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत अनेक विक्रम मोडले आहेत. अवघ्या तीन दिवसांत तीन कोटी लोकांनी हा चित्रपट पाहिल्याचे नेटफ्लिक्‍सने जाहीर केले.

“मर्डर मिस्ट्री’ या चित्रपटात हत्या, त्याचे गूढ, रहस्यांचा शोध अशा प्रकारची कथा असुन हत्येचं गूढ उलगडत असतानाच त्यात विनोद, कलाकारांची धमाल मस्तीसुद्धा आहे. पती-पत्नी त्यांच्या लग्नाच्या पंधराव्या वाढदिवशी युरोपला हनिमूनला जातात. तिथे घडणाऱ्या अनपेक्षित घटना, एका जहाजावर श्रीमंत व्यक्तीचा झालेला खून, त्यापाठोपाठ होणारे तीन खून याभोवती चित्रपटाची कथा फिरते. समीक्षकांनी या चित्रपटाला फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला नसला तरी प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्‍यावर घेतला आहे. याआधी सॅंड्रा बुलकची मुख्य भूमिका असलेला “बर्ड बॉक्‍स’ हा चित्रपट पहिल्या चार आठवड्यांत 8 कोटी लोकांनी पाहिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.