पुणे – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक, माजी नगरसेवक विकास दांगट यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई केल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मंगळवारी दिली.
यावेळी भरत झांबरे, काका चव्हाण, त्रिंबक मोकाशी उपस्थित होते. गारटकर म्हणाले, “वर्षभरापूर्वी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत प्रकाश म्हस्के व दांगट यांची मैत्रीपूर्ण लढत झाली. दोघेही राष्ट्रवादीचे होते. परंतु, एकमत होत नसल्याने मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी पक्षातील अनेकांनी दांगट यांचे काम केले होते. त्यामुळेच ते विजयी झाले. याची जाणीव त्यांनी ठेवलेली दिसत नाही.
आता बाजार समिती निवडणुकीत अजित पवार यांनी पक्षाचा अधिकृत पॅनेल उभा करण्याचा आदेश दिला. त्याबाबत मी स्वतः अनेक वेळा दांगट यांच्याशी चर्चा केली. परंतु, कायम भाजपच्या काही उमेदवारांसाठी आणि माजी संचालक मंडळात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला, त्यांच्यासाठी ते आग्रही राहिले. त्यांच्या घरातील सदस्यांना उमेदवारी देण्याची मुभा दांगट यांना दिली. पॅनेल करण्याविषयी त्यांनाच पुढाकार घ्यायला सांगितला होता. मात्र, त्यांनी वेळकाढूपणाची भूमिका घेतली. या निवडणूक प्रक्रियेत पक्षाला गाफिल ठेऊन पक्षाची फसवणूक केल्याचे गारटकर यांनी सांगितले.
शेतकरी विकास आघाडी पॅनलसाठी भ्रष्टाचाराचा कलंक ठरणार अडसर “ज्यांच्यावरील भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे 19 वर्षे बाजार समितीवर प्रशासक राहिले, त्याच तत्कालीन संचालकांना अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी विकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकारी पॅनेलने भ्रष्टाचारावर हवेली तालुक्यात रान उठविले आहे. लोकांच्या मनात भ्रष्टाचाराविषयी चीड आहे. हा कलंक या पॅनेलला भोवणार आहे. याउलट अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलने उच्चशिक्षित, तरुण आणि मातब्बर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे विजय पक्का आहे,’ असे प्रदीप गारटकर म्हणाले.
पक्षशिस्त सर्वांसाठी बंधनकारक आहे. पक्षविरोधी कारवायांबद्दल मी दांगट यांची हकालपट्टी केली आहे. हवेली तालुक्यातील इतर पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील पक्षविरोधी भूमिका घेत आहेत. त्यांनी ते थांबवावे. अन्यथा कारवाई केली जाईल.
– प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.