सागरी हद्दीत नौदलाने दिले दक्षतेचे आदेश

कोची: लष्कर ए तोयबाचे दहशतवादी तामिळनाडुत घुसल्याची बातमी गुप्तचर विभागाने दिल्यानंतर नौदलाने भारतीय सागरी हद्दीत दक्षतेचा आदेश दिला आहे. संरक्षण दलाच्या प्रवक्‍त्याने पीटीआयला सांगितले की खोल समुद्रात आणि भारतीय सागरी हद्दीत नौदल नेहमीच सतर्क असते. तथापी लष्कर ए तोयबाचे सहा अतिरेकी तामिळनाडुत घुसले असल्याच्या गुप्तचर विभागाच्या वृत्ताने नौदलाने विशेष दक्षतेचे आदेश जारी केले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर कोईमतुर मध्येही दक्षता आदेश जारी करण्यात आल्याची माहिती शहराचे पोलिस आयुक्त सुमित शरण यांनी दिली. या शहरातील संवेदनशील स्थळांवर तसेच तामिळनाडूतही अन्यत्र चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. या संशयितांबद्दलची अन्य कोणतीही माहिती मात्र अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.