देश विरोधी कारवाया खपवून घेणार नाही – कमलनाथ

मध्यप्रदेशात बजरंग दलाच्या नेत्यासह चौघांना अटक
भोपाळ: दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याच्या कारणावरून मध्यप्रदेशात बजरंग दलाच्या एका नेत्यासह एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्या प्रकरणाची सारी पाळेमुळे खणून काढली जातील असे त्या राज्याचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटले असून देश विरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बजरंग दल या संघटनेचा एक माजी नेता बलरामसिंह आणि अन्य तीन जणांना बुधवारी रात्री मध्यप्रदेश एटीएसच्या पथकाने अटक केली होती. पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेला पैसा पुरवण्याच्या रिंगशी या लोकांचा संबंध होता असे या तपास पथकातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे. दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याच्या रॅकेटशी संबंधीत असणारे कोणीही कोणत्याहीं राजकीय पक्षाशी संबंधीत असले तरी त्यांची गय केली जाणार नाही असेही त्यांनी नमूद केले आहे.

अटक करण्यात आलेल्या चौघे जण त्यांच्या पाकिस्तानी हॅंडलर्सशी संबंधीत होते व बॅंक तपशीलासह अन्य माहिती त्यांनी या हॅंडलर्सना दिली होती असेही तपासात निष्पन्न झाले आहे. याच बलराम आणि भाजपचा कार्यकर्ता धृव सक्‍सेना यांना सन 2017 मध्येहीं हेरगीरीसाठी पैसा जमवणाऱ्या रॅकेट प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर त्यांनी मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात पाकिस्तानी हॅंडलर्ससाठी हाच उद्योग पुन्हा सुरू केला होता. चित्रकुट, देवास, बरवानी आणि मंदासौर येथे पाकिस्तानी हेरगीरीला मदत करण्याच्या प्रकरणात भाजपशी संबंधीत अनेक कार्यकर्ते सापडले असल्याचा दावाहीं एका तपास अधिकाऱ्याने केल्याचे एका वृत्तवाहिनीच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×