बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन नुकतीच “शकुंतला देवी’ या बायोपिक चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. तसेच प्रेक्षकांनीही चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला होता. आता विद्या बालन भारतीय ऑलिम्पिक वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरीच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.
वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी यांच्यावर आधारित या बायोपिकची जून महिन्यात घोषणा करण्यात आली होती. संजना रेड्डीद्वारा दिग्दर्शित चित्रपटाचे निर्माता सध्या स्क्रिप्ट आन् किस्टिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात व्यस्त आहेत.
कर्णम मल्लेश्वरीच्या बायोपिकसाठी निर्मात्यांनी विद्या बालनशी संपर्क साधला आहे. या भूमिकेसाठी विद्या बालनशिवाय अन्य कोणाशीही संपर्क साधला नसून तिला चित्रपटाचा सारांश पाठविण्यात आला आहे.
या चित्रपटात विद्या बालनने उत्सुकता दाखविली आहे, परंतु अद्याप हिरवा झेंडा दाखविलेला नाही. याबाबत विद्या बालनकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
दरम्यान, कर्णम मल्लेश्वरीच्या वाढदिनी बायोपिकची घोषणा करत एक पोस्टरही जारी करण्यात आले होते. या पोस्टरवर “एका मुलीचा प्रवास, राष्ट्राला उभारण्यासाठी’ अशी टॅगलाइन होती.