45 हजार रुपये तक्रारदारांना देण्याचा आदेश
पुणे – चेन्नई ते पुणे ट्रान्सपोर्टसाठी दिलेले साहित्य खराब अवस्थेत पोहोचविणे ट्रान्सपोर्ट कंपनीला महागात पडले आहे. तक्रारदारांना नुकसान भरपाई, मानसिक त्रास आणि तक्रार अर्जाचा खर्च मिळून 45 हजार रुपये देण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला आहे.
याबाबत सोहीन दोशी (पुणे) एक्सप्रेस कार्गो पॅकर्स व मुव्हर्स, कोलकाता, बी – चेन्नई ब्रॅंच ऑफीस, पुणे ब्रॅंच ऑफीस, निगडी, पवन चौधरी आणि सुनील चौधरी यांच्याविरोधात ऍड. स्वप्निल झाडे यांच्यामार्फत येथील ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांच्या घरातील साहित्य चेन्नई येथून पुणे ट्रान्सपोर्ट करायचे होते. त्यामुळे तक्रारदारांनी विरूध्द पक्षकाराच्या कार्यालयास भेट दिली.
त्यावेळी तक्रारदारांना सांगण्यात आले की, ज्या वस्तु ट्रान्सपोर्ट करायच्या आहेत. त्यांची यादी लागेल. त्यानंतर त्याची किंमत ठरवली जाईल. किंमतीच्या 3 ट्क्के रक्कम विम्यापोटी देणे गरजेचे आहे. पॅकेजची किंमत 38 हजार 810 इतकी देण्यात आली. त्यामध्ये विम्यापोटी 12 हजार रुपयांचा समावेश आहे. त्यानंतर पावती क्रमांक 446 नुसार एकुण रक्कम 41 हजार 810 रुपये दिली. त्यानंतर पुण्यात पोहोचलेले संपूर्ण साहित्य खराब झाल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले.
प्रवासात साहित्याचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. मात्र, विरोधी पक्षाने मागणीची दखल न घेतल्याने ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यात आली. नोटीस मिळूनही विरोधी पक्षाच्या वतीने कोणीही मंचात हजर राहिले नाहीत. त्यामुळे तक्रारदाराचे वकील स्वप्निल झाडे यांनी केलेल्या युक्तीवादानंतर मंचाने वरील निकाल दिला.