संपत्तीत लांडगेंपेक्षा लांडे गब्बर!

लांडे 24 कोटी, तर लांडगे सव्वादोन कोटींचे “धनी’

पिंपरी – शहरातील “बिग फाईट’ पैकी एक असलेल्या भोसरी विधानसभा मतदार संघातील उमेदवारांमध्ये संपत्तीच्या बाबतीत माजी आमदार विलास लांडे यांनी विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यावर मात केली आहे. लांडे यांच्याकडे सुमारे 24 कोटी तर लांडगे यांच्याकडे सव्वा दोन कोटींची संपत्ती आहे. लांडे यांच्यावर 9 कोटी 93 लाख रुपयांचे कर्ज आहे. तर लांडगे यांनी वाहतूक व्यवसाय हे उत्पन्नाचे साधन दाखविले असताना एकही वाहन त्यांच्या नावावर नाही, हे विशेष.

लांडगे यांच्या नावावर 2 कोटी 7 लाख 64 हजार 614 रुपयांची स्थावर तर 36 लाख 30 हजार 913 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या पत्नी पूजा यांच्या नावावर 27 लाख 64 हजार 800 रुपयांची स्थावर व 11 लाख 76 हजार 345 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. लांडगे यांच्याकडे 45 हजार रुपये, पत्नी पूजा यांच्याकडे 35 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. लांडगे यांच्याकडे 3 लाख 49 हजार रुपये किंमतीचे 9 तोळे सोने तर पत्नी पूजा यांच्याकडे 5 लाख 4 हजार 400 रुपयांचे 13 तोळे सोने आहे. लांडगे यांच्याकडे रिव्हॉल्व्हर आहे.

विलास लांडे यांच्याकडे 22 कोटी 7 लाख 15 हजार रुपयांची जंगम आणि 2 कोटी 10 लाख 80 हजार 950 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी माजी महापौर मोहिनी लांडे यांच्या नावावर 3 कोटी 27 लाख 65 हजार रुपयांची स्थावर तर 78 लाख 22 हजारांची जंगम मालमत्ता आहे. लांडे यांच्याकडे 1 लाख 99 हजार रुपये तर पत्नी मोहिनी यांच्याकडे 1 लाख 69 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. बंधपत्रे शेअर्स, म्युच्युअल फंड यामध्ये त्यांनी 5 कोटी 76 लाख 71 हजारांची गुंतवणूक केली आहे. पत्नीपेक्षा विलास लांडे यांच्याकडे जास्त सोने आहे. लांडे यांच्याकडे 23 लाख तर पत्नी मोहिनी यांच्याकडे 7 लाख 68 हजारांचे सोने असल्याचे शपथपत्रात नमूद आहे.

लांडगेंकडे तमिळनाडू विद्यापीठाची पदवी –
महेश लांडगे यांनी तमिळनाडूच्या विनायका मिशन्स विद्यापीठातून बी-कॉमची पदवी घेतल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. तर विलास लांडे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुख्य विद्यापीठातून एम. ए. पूर्ण केल्याचे म्हटले आहे. शेती, उद्योग व शेअर्स हे लांडे यांच्या उत्पन्नाचे साधन आहे. तर कॅब आणि कामगार वाहतूक बससेवा हा लांडगे यांचा व्यवसाय आहे. दोघांच्याही नावावर एकही वाहन नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.