कार्यकर्त्यांच्या ताकदीवर विधानसभा निवडणूक लढवणार : गर्जे

पाथर्डी – सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत दोलायमान असून अचानक पक्षात येणाऱ्यांमुळे निष्ठावंतावर अन्याय होतो आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून माझ्यासमोर आग्रह धरला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणारच असल्याची घोषणा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी केली.

तालुक्‍यातील खरवंडी कासार येथील भाऊ- बाबा मंगल कार्यालयात युवकांचा परिवर्तन मेळावा गर्जे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी विष्णू खेडकर, इमरान पठाण, अभिषेक चिंतामणी, बंडू खेडकर, राजेंद्र खेडकर, हनुमान गायकवाड, भाऊसाहेब ढाकणे,सचिन ढोले, नवनाथ ढाकणे, साईनाथ ढोले, राजेश ढाकणे, गणेश सानप, विजय बांगर,शिवम बांगर, गणेश बटुळे, अजिनाथ कराड, संतोष गायके, सुभाष खेडकर, बाजीराव खेडकर, हर्षल गायकवाड आदी युवक उपस्थित होते.

गर्जे म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून गर्जे कुटुंबीय लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर प्रामाणिकपणे राहून पक्षवाढीचे निष्ठेने काम करत आहे. आजही आम्ही सर्व युवक कार्यकर्ते नामदार पंकजा मुंडे यांच्यासोबत आहोत. मात्र शेवगाव -पाथर्डी मतदारसंघात निष्ठावंतांना डावलण्याचे काम सुरू आहे. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवाच अशी इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक तुमच्या ताकदीवर लढवेल अशी घोषणा गर्जे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.