मुंबई – राज्यातील लॉकडाऊन उठल्यानंतर आता रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. त्यामुळे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोक वाहनं घेऊन घराबाहेर पडत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढलं आहे. डोंबिवलीत झालेल्या एका अपघातात, महिलेला आपला जीव गमवावा लागला. या अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज अंगावर काटा आणणारे आहे. डोंबिवलीत राहणारे सुभाष खराटे आणि निलिमा खराटे हे दाम्पत्य रस्त्यावरून आपल्या दुचाकीने जात होते. त्याचवेळी खंबाल पाडा रोडवरुन सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घंटा गाड्या जात होत्या.
खराटे दाम्पत्य रस्त्याने जात असताना अचानक समोरच्या कार चालकाने गाडी ब्रेक केली. त्यामुळे कारच्या मागे दुचाकी चालवणारे सुभाष खराटे यांना लगेच गाडी ब्रेक केली. मात्र त्याचवेळी त्यांचा तोल गेला. त्यामुळे खराटे आपल्या पत्नीसह रस्त्यावर कोसळले.
VIDEO : कचऱ्याच्या गाडी खाली चिरडून महिलेचा मृत्यू, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/fiLXOqyi7L
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) June 25, 2021
खाली कोसळल्यानंतर पत्नी निलिमा खराटे बाजुने जाणाऱ्या कचऱ्याच्या गाडीखाली चिरडल्या गेल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सुभाष खराटे बेशुद्ध असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कचऱ्याच्या गाडी चालकांला ताब्येत घेतले आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.