पुणे – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीकडून करण्यात येत असलेल्या छापेमारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्धच्या आघाडीचे नेतृत्व तुम्हा करणार का, या प्रश्नवर देखील पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहेत. यावर शरद पवार यांनी म्हटलं आहे की, अनिल देशमुखांवरील ईडीचे छापे नवीन नाहीत. याबाबत अधिक चिंता वाटत नाही. अनिल देशमुख यांच्या कुटुंबाला यापूर्वी देखील यंत्रणेद्वारे त्रास दिला गेला आहे. आणखी कुठे त्रास देता येईल का? असे प्रयत्न सुरू आहेत, असंही पवार म्हणाले.
पवार पुढे म्हणाले की, सार्वजनिक जीवनातल्या एखाद्या राजकीय नेत्याबाबत दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने ठराव करण्याचे यापूर्वी कधी पाहिले नव्हते. जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे, असं पवार म्हणाले. यावेळी पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टोला लागवला. चंद्रकांत पाटील हे कर्तृत्वावान गृहस्थ आहेत. आम्हाला यात काही आश्चर्य वाटत नाही, अस पवार म्हणाले.
सामुदायिक आघाडीचे नेतृत्व तुम्ही करणार का? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, असले उद्योग मी खूप केलेत. आता वेळ इतरांना मार्गदर्शन करण्याची आहे. काँग्रेसला घेऊनच आघाडीचा विचार करावा लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे. भाजपच्या विरुद्ध सामुदायिक नेतृत्व उभं करावं लागेल, असं पवार म्हणाले.