नवी दिल्ली : रामनवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमधील हावडा येथे हिंसाचाराची घटना घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळला आहे. रविवारी पश्चिम बंगालमधील हुगळी येथील रिश्रा परिसरात भारतीय जनता पार्टीच्या ‘शोभा यात्रे’दरम्यान हिंसाचार आणि जाळपोळ झाली. यावेळी दगडफेक झाल्याचीही माहिती मिळाली आहे.
पश्चिम बंगालमधील भाजपाचे उपाध्यक्ष दिलीप घोषयांच्या नेतृत्वाखाली या ‘शोभा यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही समाजकंठकांनी गोंधळ घातला. ही शोभा यात्रा भाजपा, विश्व हिंदू परिषद (VHP) आणि इतर काही हिंदू संघटनांनी आयोजित केली होती. या हल्ल्यात आमदार विमन घोष जखमी झाल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. तर याविषयीचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे.
#WATCH | West Bengal: Ruckus and stone pelting erupt during the BJP Shobha yatra in Hooghly pic.twitter.com/fbRdsGRkNT
— ANI (@ANI) April 2, 2023
या प्रकरणी प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, “आज हुगळी येथे जो प्रकार घडला आहे, तो हावडा येथे घडलेल्या हिंसाचाराप्रमाणेच आहे. भाजपा पूर्वनियोजित पद्धतीने दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत आहे.”
दरम्यान, रामनवमीच्या दिवशी हावडा येथे हिंसाचाराची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी एकूण ३८ जणांना अटक केली आहे. या हिंसाचारात अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. तसेच काही पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्या जाळण्यात आल्या होत्या.