Pakistan Attack: पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान हवाई दलाच्या एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. आत्मघातकी हल्लेखोरांनी पंजाबच्या मियावलीतील हवाई तळावर घुसखोरी केल्यानंतर दोन्ही बाजुने फायरिंग सुरु झाली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मियांवाली एअरबेसमध्ये अनेक दहशतवादी घुसले असून त्यानंतर सलग अनेक स्फोट झाले आहेत. या हल्ल्याचा व्हिडीओ देखील समोर आला असून येथे झालेल्या स्फोटांमुळे एअरबेसमध्ये आग लागली आहे. तसेच एअरबेसवरून जोरदार गोळीबार आणि स्फोटांचा आवाज ऐकू येत आहेत. तेहरीक ए जिहाद पाकिस्तान नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी पाकिस्तानी एअर फोर्सची थेट 3 लढाऊ विमाने जाळून टाकली आहे.
Terrorists attacked Pakistan Air Force base in Mianwali four terrorists have been eliminated, and a clearance operation is currently in progress.#Pakistan #mianwali pic.twitter.com/FFQZhVnP1n
— KK (@Way_of_lights) November 4, 2023
मियांवली या एअरबेसवर इम्रान खानच्या पक्षाच्या समर्थकांनी खानला जेव्हा अटक झालेली तेव्हा हल्ला केला होता. या आंदोलकांनी तेव्हा एका विमानाच्या संरचनेला देखील आग लावली होती. या हल्ल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात भागात हाय अलर्ट देण्यात आला आहे. एअरबेसच्या आसापासचे शाळा-कॉलेजेस बंद करण्यात आले आहेत. तसेच पाकिस्तानच्या सर्व एअर बेसवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एअरबेसच्या आत प्रचंड आग आणि धुर दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. आत्मघातकी हल्लेखोर शिडीवरून तिथे घुसले आणि त्यानंतर त्यांनी हल्ला सुरू केला. एकामागोमाग एक असे अनेक बॉम्बस्फोटाचे आवाजही ऐकायला आल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या हल्ल्यात चार दहशतवाद्यांना ठार केल्याचे सांगितले जात आहे. परंतु अद्याप या घटनेबाबत पाकिस्तान सरकारकडून कोणतेही वक्तव्य केलेले नाही.