मुंबई – सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मुद्दावर आणि ओबीसी आरक्षणावरून विरोधक पहिल्या दिवसापासून आक्रमक आहेत. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत आहेत. मात्र भाजपचे आमदार गिरीश महाजन त्याचवेळी डुलकी घेताना दिसले.
भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश महाजन यांना फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच डुलकी लागल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सभागृहात दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी फडणवीस एका अधिकाऱ्याने सरकारी कार्यालयामध्ये गोळीबार केल्याच्या मुद्द्यावर बोलत होते. या प्रकरणी ते संदर्भ देत होते. मात्र त्याचवेळी गिरीश महाजनांचा डोळा लागला.
दरम्यान गिरीश महाजन यांना डुलकी लागली हे कळताच, आमदार आशिष शेलार यांनी त्यांना धक्का देत जागं केलं. त्यानंतर ते खडबडून जागे झाले. विशेष म्हणजे झोप मोड होताच महाजन यांनी थेट हात वर करत गोळीबार गोळीबार करत फडणवीसांच्या भाषणातील मुद्दा पुढे रेटला.