नवी दिल्ली : पाकिस्तानमधील खानेवालमध्ये पीपीपीच्या नेत्या आणि पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या कन्या असिफा भुट्टो यांच्यासोबत एक दुर्घटना घडली आहे. एका कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमाचे एक ड्रोन अचानकपणे येऊन त्यांना धडकले. या घटनेमुळे असिफा गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या डोळ्यांना काही टाके पडल्याचे सांगण्यात येत आहे.
पीपीपी नेत्यांकडून पाकिस्तानमधील खानवाल भागात आंदोलन करण्यात आले होते. सध्याच्या इम्रान सरकारच्या विरोधात पीपीपी नेते एकत्र आले होते. या आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या प्रसारमाध्यमांचा मोठा जनसमुदायही यावेळी उपस्थित होता. पण एका मीडिया चॅनलचा ड्रोन अचानक पीपीपी नेत्या असिफा भुट्टो यांच्यावर धडकला आणि त्या गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील आता समोर आला आहे.
View this post on Instagram
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असल्याचे सांगण्यात येतआहे. याबाबत बिलावल भुट्टो म्हणाले की, हा फक्त अपघात आहे की कोणाचे तरी कट कारस्थान आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, बिलावल भुट्टो यांच्या सुरक्षा कर्मचार्यांनी ड्रोन ऑपरेटरला पकडले असून त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तानच्या पंजाब सरकारचे प्रवक्ते हंसन खवर यांनी सांगितले की, डॉ. बाबर यांना घटनेनंतर तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. ते स्वत: कंटेनरमध्ये गेले आणि त्यांनी असिफा यांच्यावर उपचार केले. असिफा यांच्या डोळ्यावर खरसटले असून हातावर जखमा झाल्या आहेत. आधी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे सांगण्यात आले होते, मात्र आसिफा यांनी पट्टी बांधूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, त्यांचा पट्टी बांधलेला एक फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच, पाकिस्तान सरकारचे अनेक मंत्री आणि इतर नेते सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असिफा यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करत आहेत.