पुण्याचा पारा 37.8 अंश सेल्सिअसवर
राज्यात तुरळक पावसाचा अंदाज
पुणे – विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे तापलेल्या विदर्भाला थंड करण्यासाठी येत्या दोन दिवसांत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. राज्यात शनिवारी सर्वांत जास्त अमरावती येथे 43.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर कोकण-गोव्यातील हवामान कोरडे होते. मागील आठ दिवसांपासून विदर्भ चांगलाच तापला असून, दिवसेंन दिवस कमाल तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे पुढील दोन दिवसात विदर्भात तर 10 एप्रिल रोजी विदर्भासह मराठवाड्यात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे शहरातील कमाल तापमानात एक अंशांनी घट झाली असली, तरी उन्हाचा चटका कमी झाला नाही. शनिवारी (दि. 6) शहरात 37.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मागील दहा दिवसांपासून उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाही-लाही झाली आहे. रात्रीचा उकाडा वाढला असून, येत्या दोन दिवसानंतर पुन्हा कमाल तापमानात वाढ होणार आहे. 40 अंशापर्यंत कमाल तापमान जाण्याची शक्यता आहे.