Maratha Reservation – मराठा आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या मागण्या शासनाने मान्य केल्यानंतर राज्यभरात शनिवारी सकल मराठा समाज बांधवांनी फटाके फोडत जल्लोष केला.
हिंगोलीत दुध विक्रेत्यांनी सुमारे १००० लिटर दुधाचे वाटप करून आनंद व्यक्त केला आहे. यावेळी मराठा आरक्षणासह एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
हिंगोली शहरासह जिल्हाभरातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सकल मराठा समाजातील नागरीक सहभागी झाले होते. आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा, उपोषणे करण्यात आली.
त्यानंतर प्रत्येक गावातून साखळी उपोषण देखील करण्यात आले. हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी लाखो मराठा बांधव उपस्थित होते.
संभाजीनगरातही जल्लोष –
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचे आंदोलन यशस्वी ठरल्याच्या मुद्यावर छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात मराठा बांधवांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना व त्यांच्या सगेसोयऱ्यांना मराठा आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचीही ग्वाही दिली आहे.