वॉशिंग्टन – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाला तेथील न्यायालयाने अखेर सोमवारी मंजुरी दिली आहे. सोमवारी किंग काउंटी सुपीरियर कोर्टाच्या न्यायाधीशांनी या घटस्फोटाच्या निर्णयावर स्वाक्षरी केली. त्याच बरोबर बिल आणि मेलिंडा यांच्या जवळपास दोन दशक असलेल्या पती-पत्नी नात्याची अखेर झाली.
मागील वर्षी बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी एका निवदेनाद्वारे विभक्त होत असल्याचे जाहीर केले होते. हा निर्णय परस्पर सहमतीने घेतला असल्याचे दोघांनी स्पष्ट केले होते. कोर्टाच्या दस्ताऐवजात संपत्ती वाटप, पोटगीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
बिल गेट्स यांच्याकडे 150 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स यांची पहिली भेट 1987 मध्ये झाली होती. मेलिंडा यांनी त्यावेळी मायक्रोसॉफ्ट कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम सुरू केले होते. वर्ष 1994 मध्ये बिल आणि मेलिंडा यांचा विवाह झाला होता. आता 27 वर्षांनी या नात्याची सांगता झाली.
अत्यंत दु:खद माइलस्टोन
दरम्यान, या घटस्फोटानंतर बिल गेट्स यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा अत्यंत दु:खद माइलस्टोन असल्याचे नमूद करतानाच मेलिंडा अत्यंत महान व्यक्ती आहे. आता आमचे सहजिवन संपुष्टात येणे क्लेशकारक असल्याचे ते म्हणाले. मात्र यापुढेही आमचा संवाद आणि कार्य सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.