पुणे – ज्येष्ठ लेखक आणि नाट्यकर्मी रत्नाकर मतकरी यांनी साहित्य, बालनाट्य, नाटक आदी सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांनी अनेक दशके कार्य केले. मतकरी यांच्या निधनाने “चतुरस्र व्यक्तिमत्त्व’ हरपल्याची भावना पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केली.
रत्नाकर मतकरी हे बहुमुखी प्रतिभावंत होते. ते स्वतःच्या अटींवर जगणारे साहित्यिक होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पद्धत रद्द झाल्यानंतर संमेलनाचे अध्यक्षपद साहित्यिकांना सन्मानाने देण्यास सुरुवात झाली. यावेळीही साहित्यिकांनी सर्जनशील काम करावे संमेलनात वेळ घालवू नये, असे त्यांचे ठाम मत होते. राजकारण, समाजकारण आणि साहित्यकारण यातील न पटणाऱ्या गोष्टींविषयी ते स्पष्टपणे बोलत. त्यांनी जीवन मूल्यांशी आणि कलामूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या निधनाने एक चतुरस्र साहित्यिक मराठी साहित्यविश्वाने गमावला आहे.
– प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद
रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेल्या “ब्लाइंड गेम’ या नाटकाची मी नुकतीच “रसिक मोहिनी’ या संस्थेच्या माध्यमातून निर्मिती केली होती. ऑगस्टच्या दरम्यान ही प्रक्रिया सुरू झाली. त्यांना संकल्पना सांगितल्यानंतर, त्यांनी महिनाभरात मला नाटक लिहून दिले होते. त्यासाठीच्या डिझाइनसाठी देखील त्यांनी सहकार्य केले होते. इतकेच नव्हे तर, “ब्लाइंड गेम’च्या पहिल्या शुभारंभाच्या प्रयोगाला ते उपस्थित होते. ते 80 वर्षांचे असूनही, त्यांचा उत्साह, बोलणे तरूण व्यक्तीसारखे होते. याशिवाय पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत आम्ही त्यांची “अंधारवाडा’ ही एकांकिका सादर केली होती. त्या नाटकाला पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या नाटकाने पुरस्कार मिळण्यास सुरुवात झाली होती. “ब्लाइंड गेम’ या नाटकाचा लॉकडाऊनपूर्वी दि.12 मार्चला प्रयोग झाला. त्यानंतर आमचे फोनवर बोलणेदेखील झाले. त्यांचे निधन हा मोठा धक्का आहे.
– भाग्यश्री देसाई, अभिनेत्री आणि निर्माती
रत्नाकर मतकरी यांनी नाटक, कथा आदी प्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले आहे. 2001 मध्ये पुण्यात झालेल्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षदेखील राहिले आहेत. बालरंगभूमीबाबत त्यांचे योगदान मोठे आहे. मागील काही महिन्यांपूर्वी अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने यंदाचा जीवनगौरव पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना देणार होतो. त्यांच्याशी याबाबत बोलणेदेखील झाले होते. त्यांनी नंतर स्वत:हून फोन करून “सध्या कोणतेच पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे ठरवले आहे. त्यामुळे राग मानू नका’ असे सांगितले होते.
– सुनील महाजन, कार्यवाह, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था
रत्नाकर मतकरी हे बालरंगभूमीसाठी आदर्श होते. बालरंगभूमी चळवळीमधील ते प्रेरणास्थान होते. त्यांच्या बालनाट्यांची शैली अनोखी होती. ते वेगळ्या पद्धतीची नाटके लिहायचे, त्यांचा वेगळा विचार असायचा आणि ही त्यांची खासियत होती. मोठे लेखक असूनही तळागाळातील मुलांसाठी काम करणे, हे त्यांचे वैशिष्ट्ये होते. साधारण पाच वर्षांपूर्वी आम्ही संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. मात्र, तेव्हा प्रकृती अस्वास्थामुळे ते येऊ शकले नाहीत. पण, त्यांनी आम्हांला शुभेच्छापत्र दिले. ते आजही संस्थेच्या कार्यालयामध्ये आहे. त्यांनी आमचे कार्य सविस्तरपणे समजून घेऊन आशीर्वाद दिले. तेव्हा घेतलेली भेट दुर्दैवाने शेवटची ठरली.
– प्रकाश पारखी, अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद
रत्नाकर मतकरी यांचे बाल साहित्य
– अचाटगावची अफाट मावशी
– अलबत्या गलबत्या
– चटकदार
– चमत्कार झालाच पाहिजे
– यक्षनंदन
– राक्षसराज जिंदाबाद
– शाबास लाकड्या
– सरदार फाकडोजी वाकडे
– अलिबाबाचं खेचर एकोणचाळीसावा चोर
– अलल् घुर्र घुर्र
– आचार्य सर्वज्ञ
– एक होता मुलगा
– गाऊ गाणे गमतीचे
– चटकदार
– ढगढगोजीचा पाणी प्रताप
– बच्चे लुच्चे
– आरशाचा राक्षस
– निम्माशिम्मा राक्षस
– धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी
– महाराजांचा महामुकुट
– भूत-अद्भुत
– माकडा माकडा हुप !
– मांजराला कधीच विसरू नका
– राजकन्येचा कावळ्याचा फार्स (बालनाटक)
– राक्षसराज झिंदाबाद (बाल साहित्य)
– शाबास लाकड्या (बाल साहित्य)
रत्नाकर मतकरी यांची प्रकाशित पुस्तके
– अजून यौवनात मी (नाटक)
– ऍडम
– अंतर्बाह्य
– अपरात्र (कथासंग्रह)
– अंश (कथासंग्रह)
– आत्मनेपदी (लेखकाने स्वतःच्या घडणीबद्दल, लिखाणाबद्दल, नाट्यचळवळीबद्दल, स्वतःवर प्रभाव टाकणाऱ्या माणसांबद्दल लिहिलेले मनोगत)
– आम्हाला वेगळं व्हायचंय (नाटक)
– आरण्यक (महाभारतावरील कथानकावर आधारित नाटक)
– इंदिरा
– इन्व्हेस्टमेंट
– एकदा पहावं करून ( अनुवाद)
– एक दिवा विझताना (कथासंग्रह)
– ऐक टोले पडताहेत (गूढकथासंग्रह)
– कबंध (कथासंग्रह)
– कर्ता-करविता (नाटक)
– कायमचे प्रश्न (वैचारिक)
– खेकडा (कथासंग्रह)
– खोल खोल पाणी (नाटक)
– गहिरे पाणी
– गांधी : अंतिम पर्व (नाटक)
– गोंदण (कथासंग्रह)
– घर तिघांचं हवं
– चि.सौ.कां.चंपा गोवेकर (नाटक)
– चार दिवस प्रेमाचे (ललित)
– चूकभूल द्यावी घ्यावी (एकांकिका)
– चोर आणि चांदणं
– जस्ट अ पेग (एकांकिका)
– जादू तेरी नझर (नाटक)
– जावई माझा भला (नाटक)
– जोडीदार
– जौळ (कथासंग्रह)
– तन-मन (नाटक)
– तृप्त मैफल (कथासंग्रह)
– दहाजणी
– दादाची गर्ल फ्रेंड
– निजधाम (कथासंग्रह)
– निर्मनुष्य (कथासंग्रह)
निवडक मराठी एकांकिका
– परदेशी (कथासंग्रह)
– पानगळीचं झाड
– पोर्ट्रेट आणि दोन एकांकिका
– प्रियतमा (नाटक)
– प्रेमपुराण (एकांकिका)
रत्नाकर मतकरी यांना मिळलेले पुरस्कार
– अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा ज्योत्स्ना भोळे पुरस्कार
– उत्कृष्ट पटकथेसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार (चित्रपट : माझं घर माझा संसार)
– नाट्यदर्पणचा नाना ओक पुरस्कार
– अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा देवल पुरस्कार
– राज्य शासनाचा अत्रे पुरस्कार
– नाट्यव्रती पुरस्कार
– संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
– माझे रंगप्रयोग या ग्रंथासाठी इंदिरा-भालचंद्र पुरस्कार
– शांता शेळके पुरस्कार
– साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार