वेल्हे -करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वेल्हे तालुक्यातील 8 रुग्णांपैकी 7 जणांचा अहवाल सलग तीनवेळा तपासले असता निगेटिव्ह आल्याने संबंधित रुग्णांचे शनिवारी (दि. 2) प्रशासनाकडून ओसाडे (ता. वेल्हे) येथे गुलाबपुष्प देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. राहिलेल्या एका रुग्णाचे दोन अहवाल निगेटिव्ह आले असून, तिसरा येणे बाकी आहे. तो अहवाल आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात येणार आहे.
वेल्हे तालुक्याच्या पानशेत परिसरातील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचा करोना अहवाल 14 एप्रिलला पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीच्या संपर्कातील निगडे मोसे व ओसाडे परिसरातील 7 जणांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने वेल्हे तालुक्यात एकच खळबळ
उडाली होती.
उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी विशाल शिंदे, साहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुदर्शन मालाजुरे, गटशिक्षणाधिकारी संजय तांबे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश सूर्यवंशी, डॉ. देवकर, डॉ. दीप्ती सुर्यवंशी, आरोग्य सेविका यांच्या टीमने युध्द पातळीवर लोकांचे विलगीकरण केले.
आरोग्य यंत्रणेमार्फत विलगीकरणातील सर्वांची वैद्यकीय तपासणी करून करोना संसर्ग रोखण्यात यश मिळवले.वेल्हे तालुक्यातील 8 रुग्णांपैकी सिंबॉयोसिस रुग्णालयातील 1, भारती हॉस्पिटलमधील 1 व नवले हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 5 रुग्णांची तीनवेळा तपासणी करून अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून मुक्त करण्यात आले. राहिलेल्या एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिसरा अहवाल आल्यानंतर घरी सोडण्यात येणार असून वेल्हे तालुका करोनामुक्तीच्या उंबरठ्यावर पोचला आहे.