शिक्रापूर – येथील एका महिलेला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली असून संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.
शिक्रापूर येथील औरा सिटी येथे राहणाऱ्या एका महिलेला पोटाचा त्रास होत असल्यामुळे तिने पुणे येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. दि. 27 एप्रिल रोजी पुणे येथे उपचार सुरू केल्यानंतर (दि. 30) एप्रिल रोजी या महिलेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यावेळी या महिलेचा करोना पॉझिटिव्ह अहवाल असल्याचे समोर आले आहे.
याबाबत माहिती प्राप्त होताच शिरूरचे नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, तलाठी अविनाश जाधव यांसह आदींनी औरा सिटी येथे धाव घेत परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने फवारणी सुरू केली आहे. महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेतले आहे.
प्रशासनाकडून शिक्रापूर येथे करोना बाधित महिला आढळून आलेल्या ठिकाणापासून काही परिसर पूर्णपणे बंद केला आहे. त्याठिकाणी औषध फवारणी केली आहे. पुढील काही काळ देखील येथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार आहे.
नागरिक आता तरी खबरदारी घेणार का?
शिक्रापूरमध्ये काही दिवसांपूर्वी डॉक्टर करोना बाधित असल्याचे समोर आले होते. त्यानंतर विठ्ठलवाडी येथे एका लहान मुलीला करोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाला. तरी देखील नागरिक विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू लागले असताना येथील एका व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाला. नव्याने एका महिलेला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. महिन्याभरात एकापाठोपाठ पाच रूग्ण आढळल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.