– संजय कडू
पुणे(प्रतिनिधी) – परजिल्ह्यातील ग्राहकांना वाहन विकण्यासाठी बनावट भाडेकराराचा वापर होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, अशा स्वरूपाची एक घटना उघडकीस आली असली तरी प्रादेशिक परिवहन विभागातील भोंगळ कारभारामुळे अशी अनेक वाहने नोंदली गेली आहेत. त्याचा वापर गुन्हेगारांकडून केला जाण्याची शक्यता आहे. मात्र पविहन विभाग या घटनांकडे डोळेझाक करत असून त्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचे चित्र आहे.
वाहन विक्रेत्यांचे आरटीओत रॅकेट
- गुन्हेगारांना शोधण्यात पोलिसांपुढील आव्हान वाढले
- मालक वाहनासह बेपत्ता झाल्याने पोलिसांची डोकेदुखी
- कागदपत्रांच्या पडताळणीत बेपर्वाई की आणखी काही?
एखाद्या गुन्ह्यात वापरलेल्या वाहनावरून पोलीस अनेकदा आरोपीचा माग काढतात. मात्र अशा बनवाट भाडे कराराच्या सहाय्याने नोंदलेल्या वाहनाच्या मालकाचा माग काढायचा कसा असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय हे भाडे करार मुळात बनावट दस्तावर नोंदले असल्याने त्याची मूळ मालकांना कल्पना असणार नाही. एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना मूळ मालकाला विनाकारण पोलिसांच्या ससेमिऱ्याला सामोरे जावे लागणार आहे.
“भाडेकरार नोंदणीकृत असेल तरच आपण घेतो. डिलरकडून कागदपत्रे अपलोड केल्यावर संशयीत कागदपत्रांची तपासणी केली जाते. फोटोशॉपचा वापर करुन कोणी जर भाडेकरार देत असेल तर अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येतील
– अजित शिंदे, आरटीओ, पुणे
यासाठी जेवढे प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी दोषी आहेत, तेवढेच किंबहुना काही अधिक प्रमाणात वाहन विक्रेते आणि त्यांचे आरटीओतील दलाल अधिक दोषी आहेत. वाहन विक्री शोरूम चालकांकडून ऑनलाइन आणि प्रत्यक्ष जमा करण्यात येणारी कागदपत्रे गांभीर्याने पडताळली जात नसल्याने गुन्हेगारांचे फावले आहे.
“भाडेकरात करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ऍथोराइज सर्व्हिस प्रोव्हायडर नेमले आहेत. नागरिकांना घरबसल्या भाडेकरात करता यावा म्हणून ओपन पोर्टलची सुविधाही दिली आहे. ही संधी साधून काही अपप्रवृत्ती सक्रीय झाल्या आहेत. ते फोटोशॉपचा वापर करुन बनावट भाडेकरार करुन देत आहेत. याचा वापर वाहन रजिस्टेशन तसेच इतर सरकारी आणि खासगी कामानिमीत्त केला जात आहे. ही बाब गांभीर्यान घेण्याची गरज आहे. ओपन पोर्टल बंद करून फक्त ऍथोराइज सर्व्हिस प्रोव्हायडर (ASP) मार्फतच भाडेकरार सुविधा करावी असे पत्र नुकतेच महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक ओंप्रकाशजी देशमुख साहेब ह्यांना दिले आहे.
-सचिन शिंगवी (अध्यक्ष, असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंट)
नवीन व जुन्या वाहनाची खरेदी विक्री करताना प्रादेशिक परिवहन कार्यालयात रहिवासाचा पुरावा जोडावा लागतो. भाडेकरू असेल तर त्याला भाडेकरार आणि मूळ मालकाच्या घराचे वीज बील जोडावे लागते. सारथी पोर्टलवर कागदपत्रे स्कॅन करून जोडल्यावर प्रत्यक्षात प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊनही त्याची प्रत द्यावी लागते. या मूळ कागदपत्रांची पडताळणी करणे, ही प्रादेशिक परिवहन कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी असते. मात्र, येथेच ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. वाहन विक्रेते आणि दलालांमार्फत आलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करताच कार्यवाही झटपट करण्याला प्राधान्य दिले जाते, असे या विभागातच बोलले जाते.