पुणे-सोलापूर सीमेवर पोलिसांचा दिवसरात्र पहारा
बावडा (वार्ताहर) – सध्या जगभर करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून जोरदार प्रयत्न चालू आहेत. पुणे-सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर सराटी (ता. इंदापूर) येथे अकलूपोलिसांकडून प्रत्येक वाहनांची व वाहनचालकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
संपूर्ण जगात करोनाच्या विषाणूंनी थैमान घातले असल्याने देशासह राज्यभर सर्वच यंत्रणा युद्ध पातळीवर आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसून येत आहेत. सोमवारी (दि. 22) राज्यात संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करताच पुणे- सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर इंदापूर- अकलूज मार्गावर सराटी येथे पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक वाहनांची व वाहन चालकांची कसून चौकशी केली जात आहे.
या मार्गावरून पुण्याकडून सांगोला, पंढरपूर, सांगली, मिरज, मंगळवेढा तसेच कर्नाटकाकडे जाणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते. याच कारणाने अकलूज (ता. माळशिरस) पोलीस प्रशासनाकडून इंदापूरकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनास थांबवून गाडी कुठून आली, कुठे निघाली तसेच कोणास काही आजार आहे का? अशा प्रकारे चौकशी करून येणाऱ्या – जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची व प्रवाशांची संख्या अशा प्रकारे नोंद केली जात आहे.