पितृपंधरवड्यात करंजेपूल बाजारात भाज्यांचे दर स्थिर

वाघळवाडी – पितृपंधरवडा सुरू झाला की, भाज्यांचे दर कडाडतात; मात्र बारामती तालुक्‍याच्या बागाती भागात अनेक ठिकाणी यंदा चांगला पाऊस झाला, त्यामुळे करंजेपूल बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने भाव स्थिती असल्याने भाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आहे. मात्र, पैसे मिळण्याच्या हंगामात भाव स्थिर असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली.

पितृपक्षाच्या पार्श्‍वभूमीवर नैवेद्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या भाजीपाल्याचे खरेदीचे प्रमाण ग्राहकांकडून जास्त असते व दर चांगला मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती आठवडे बाजारात मालविक्रीसाठी आणला होता, पण बाजारामध्ये सर्वच पालेभाज्या, फळभाज्या यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. वांगी, आले, भेंडी, चवळई, टोमॅटो, कारली, काकडी, शेवगा, गाजर, मुळा, श्रावणी घेवडा, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, पावट्या आदींची आवक अधिक झाल्यामुळे दर कमी झाले होते. पालेभाज्यांमध्ये आळुची पाने, मेथी, शेपू, पालक, तांदुळाचा, आंबटचुका, कांदापात व कोंथिबीर जुडी दर 5 ते 10 प्रति जुडी होता. बटाटा नेहमीप्रमाणे 20 तर कांदा 30 किलोचा दर होता

लिंबाने पार केली शंभरी
दैनंदिन आहारामध्ये लिंबाचे फार महत्त्व असून करंजेपूल आठवडे बाजारामध्ये लिंबे 100 ते 120 किलो दर विकली जात होती. किरकोळ विक्री नगावरती 5 एक नग असे सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे होती, तर ग्राहक नाइलाजास्तव खरेदी करत होते. देशी लसूण 120-150रुपये किलोच्या आसपास दर होता. मटार 100 रुपये किलो या दराने विकला जात होता. गावरान गवार 80किलो होता.

Leave A Reply

Your email address will not be published.