हद्दवाढीनंतर आव्हान पायाभूत विकासाचे

त्रिशंकू भागाचा नियोजनबद्ध विकास आवश्‍यक; सातारा शहराचा परिघ वाढणार

सातारा  – तब्बल बेचाळीस वर्षं रखडलेली सातारा शहराच्या हद्दवाढीची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सव्वीस चौरस मैल परिघात विस्तारणाऱ्या शहराचा विकास आता “पॅकेज’ने नाही तर नियोजनबद्ध पद्धतीने करावा लागणार आहे. पायाभूत सुविधांसह त्रिशंकू भागांचा विकास आणि सेवांचे सुलभीकरण, ही आव्हाने पालिकेला पेलावी लागणार आहे. हद्दवाढीनंतर शहराची लोकसंख्या सव्वादोन लाख होणार असून नगरसेवकांची संख्या 52 होणार आहे. साताऱ्याला विकासाची नवी ओळख देण्यासाठी राजकीय इच्छाशक्‍ती पणाला लावत “अ’ वर्ग पालिका तयार करण्याचे आव्हान नेत्यांपुढे राहणार आहे.

राजकीय अडथळ्यांची शर्यत पार करत सातारा पालिकेच्या हद्दवाढीचं घोडं अखेर गंगेत न्हालं. आता नवा पक्ष व नवी जवाबदारी यामुळे “टक्‍केवारी’चा सोस बाजूला ठेवून राजकीय इच्छाशक्‍ती दाखवावी लागणार आहे. उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले हे एकाच पक्षात आल्याने पक्षीय भेद, विरोधी आघाडी हे मुद्दे सध्या तरी संपले आहेत. भाजपमधील आयाराम व निष्ठावंतांनाही आपल्या वैयक्‍तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून एकमेकांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. डस्टबिनमध्ये फायली जात असल्याची तक्रार आता संपली असून विकासकामांचे टेंडर 308 मध्ये न अडकता ऑनलाइन निघतील, याची काळजी घ्यावी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या ठेकेदारी संस्कृतीचा वसा भाजपमध्ये चालणार नाही, याचेही राजकीय भान बाळगण्याची गरज आहे.

हद्दवाढीमुळे विकासाच्या नव्या वाटा
प्रस्तावित हद्दवाढीमुळे शहर साडेआठ किलोमीटरवरून सव्वीस चौरस किलोमीटरपर्यंत विस्तारणार आहे. पालिका हद्दीतील लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार एक लाख 29 हजार असून हद्दवाढीनंतर ती सव्वादोन लाखांपर्यंत जाणार आहे. आठ हजार लोकसंख्येला एक नगरसेवक या प्रमाणानुसार बारा नगरसेवक नव्याने वाढणार आहे. विभागीय कार्यालयांचा ताबा व सुलभ सेवांची काळजी पालिकेला घ्यावी लागणार आहे.

आस्थापना रचना बदलणार
पालिकेत सध्या राज्य संवर्गातील 12 अधिकारी व 19 लिपिकांसह 475 कर्मचारी आहेत. दरे खुर्द, शाहूपुरी व विलासपूर व खेड ग्रामपंचायतींमध्ये असलेला महामार्गाच्या अलीकडचा करंजे ग्रामीणपर्यंतचा भाग हद्दवाढीत येणार आहे. या ग्रामपंचायतींचे 30 टक्‍के म्हणजे 52 कर्मचारी ग्रामीण विकास यंत्रणेकडून नगरविकास विभागाकडे वर्ग करावे लागतील. त्यातून पालिकेची आस्थापना रचना व विभागीय कार्यालयांची व्यवस्था टप्प्याटप्प्याने बदलण्याचे प्रशासकीय कौशल्य पार पाडावे लागेल.

त्रिशंकू भागासाठी पॅकेज आवश्‍यक
त्रिशंकू भागांची अडचण हद्दवाढीने दूर झाली आहे. चार भिंती, शाहूनगर, जगतापवाडी, गोडोली, अंजली कॉलनी, अर्कशाळानगर, केसकर कॉलनी, गोडोली तळ्यापासून अजंठा कॉलनीपर्यंतचा भाग हद्दीत आल्याने तेथे सातारा पालिकेला पायाभूत सुविधा विशेषत्वाने द्याव्या लागणार आहेत. मालमत्तांचे वर्गीकरण, कर्मचाऱ्यांचे सेवाबदल या गोष्टींची प्रशासकीय प्रक्रिया काळजीपूर्वक करावी लागेल. दीडशे कोटींची अनुदाने व पन्नास कोटींचे उत्पन्न यातून पालिका पहिल्या दोन वर्षांत तरी त्रिशंकू भागाचा विकास करू शकणार नाही. त्यासाठी पॅकेजचा बूस्टर डोस घ्यावा लागेल.

पालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागाला पायाभूत सुविधा देण्यासाठी नगरविकास विभागाला प्रस्ताव सादर करणे, तत्पूर्वी हद्दवाढीची अधिसूचना राजपत्रित करून घेणे, ही प्रक्रिया करून घ्यावी लागेल. हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागासाठी तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने करवाढ केली जाईल.
शंकर गोरे, मुख्याधिकारी, सातारा नगरपालिका.

नागरिकांना पायाभूत सुविधा विनाविलंब मिळाव्यात, ही अपेक्षा असते. मात्र, सातारा पालिकेकडून त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. हद्दवाढीमुळे पालिकेला काम करावेच लागणार आहे.
अनघा पाटील, शनिवार पेठ, सातारा.

शहराची हद्दवाढ बरीच वर्ष प्रलंबित होती. आता विकासकामांवर मर्यादा येणार नाहीत. लगेच कोणतेही कर लादले जाणार नाहीत याची काळजी घेतली जावी. स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा.
महेश पाटील, बोगदा परिसर, सातारा.

Leave A Reply

Your email address will not be published.