खेड तालुक्‍यात समस्यांचा ‘डोंगर’

आमदार दिलीप मोहिते यांच्यासमोर मोठी आव्हाने

पुणे – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे 2005-09 ते 2009 ते 2014 या 10 वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार होते. तर 2014मध्ये येथे राष्ट्रवादीला फटका बसला अन्‌ त्यांच्या विरोधी शिवसेना पक्षाचे आमदार विराजमान झाले. मात्र, शिवसेनेनेला केवळ पाच वर्षेच हा मतदारसंघ सांभळता आला. 2019मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला गड पुन्हा काबिज केला. मात्र, या 15 वर्षांच्या कालवधीत ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्यांनी आता उग्र रुप धारण केले आहे. त्यामुळे गेल्या 15 वर्षांत उग्र झालेल्या या समस्या आमदार दिलीप मोहिते आपल्या अनुभावाने सोडवून नागरिकांना दिलासा देतील का, हे पाहणे औत्स्युक्‍याचे आहे.

खेड-आळंदी मतदारसंघ निसर्ग साधनसंपत्तीने नटलेला आहे. तालुक्‍यात तीन धरणांच्या माध्यमातून भरमसाठ पाणी उपलब्ध होऊनही अनेक भागात उन्हाळ्यात पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी महिलांना, लहान मुलामुलींना डोंगरदऱ्यांमध्ये दाहीदिशांना भटकंती करावी लागत आहे. प्रसंगी त्यांना अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे. दुसरीकडे या निर्माण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे तालुक्‍यात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण मात्र, समस्या कमी
होण्याऐवजी त्या दिवसेंदिवस वाढतच आहेत.

त्यातच 10 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाल्याने आमदार गोरे यांच्याकडून तालुक्‍यातील जनतेला खूप अपेक्षा होत्या मात्र, पाच वर्षांच्या कालावधीत हे सर्व प्रश्‍न पूर्णपणे सोडवण्यात व ऐन निवडणुकीत त्यांच्यासबोत दगाफटका झाल्याने त्यांना अपयश आले असल्याची चर्चा खेड तालुक्‍यात आहे. तर आता या 15 वर्षांत वाढलेल्या समस्यांच्या कचाट्यातून आमदार मोहिते खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या मदतीने जनतेला कसे बाहेर काढणार ही आणखी समस्यांच्या खाईत लोटणार हे पाच वर्षांच्या कार्यकाळात स्पष्ट होईल.

प्रकल्पग्रस्तांचा तालुका – उद्योगधंद्यांचा तालुका म्हणून खेड तालुक्‍याची ओळख निर्माण झालेली आहे. विविध उद्योगधंदे व प्रकल्पांमुळे तालुक्‍यातील कृषिक्षेत्रात झपाट्याने घट झाली. दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. त्यामुळे खेड तालुका हा प्रकल्पग्रस्त तालुका म्हणूनच ओळखला जातो. या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित करण्यात आल्या, परिणामी तालुक्‍यातील शेतकरी मात्र बाधित झाला. अनेकांना विस्थापित व्हावे लागले. काहीजण भूमिहीन झाले. त्यात अनेकांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. दरम्यान, पुणे व पिंपरी चिंचवड या दोन महानगरांच्या अनियंत्रित वाढत्या नागरीकरणाचा अतिरिक्‍त भार हाकेच्या अंतरावरील खेड तालुक्‍याला सहन करावा लागला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

या समस्यांचा डोंगर –

खेड तालुक्‍यात अनेक वर्षांपासून धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन, चाकणसारखी मोठी औद्योगिक वसाहत असूनही वाढती बेरोजगारी, अंतर्गत स्त्यांची असलेली दयनीय स्थिती, पाणी उपलब्ध असूनही सिंचनापासून वंचित असलेले कृषिक्षेत्र, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न, आदिवासींना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सध्या अतिवृष्टीमुळे भुईसपाट झालेल्या बळीराजाला लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी आमदार दिलीप मोहिते काय उपाययोजना करणार आणि शासनाकडे कसा पाठपुरवा करणार हे आगामी काळात कळेच. मात्र, तालुक्‍यातील वर्षानुवर्षे प्रलंबित पडलेल्या विविध प्रश्‍नांची सोडवणूक करताना आमदार दिलीप मोहिते यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

वाहतूककोंडी सर्वांत मोठी डोकेदुखी

खेड तालुक्‍यातून चिंबळीपासून ते खेड घाट ओलांडल्यावर पेठगावापर्यंत पुणे-नाशिक महामार्ग जातो. मात्र, यात पूर्ण हद्दीत एकहही ठिकाण असे नाही की त्याठिकाणी वाहतूककोंडी होत नाही. या वाहतूककोंडीचा सर्वाधिक सामना तो चाकण आणि राजगुरूनगर येथे प्रवाशांसह स्थानिकांना करावा लागतो. तर आळंदी शहराताही वाहतूककोंडीची मोठी समस्या असून येथेही भाविक तासन्‌तास कोंडीत अडकत असतात. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी आमदार दिलीप मोहिते काही “प्लॅन’ आखणार का हे पाहणे औत्स्युक्‍याचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.