पिंपरी, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास शिवतांडव’ या मराठी नाटकातून ३७ कलाकार साकारणार असून अभिनेते शंतनू मोघे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. या नाटकाचा संहिता पूजन सोहळा चिंचवड येथील श्री मोरया गोसावी महाराज समाधी मंदिरात झाला.
या वेळी ‘शिवतांडव’ या नाटकाचे निर्माते, अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, दिग्दर्शक दिलीप भोसले, अभिनेते शंतनू मोघे यांच्यासह नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नाटकाबद्दल माहिती देताना दिग्दर्शक दिलीप भोसले म्हणाले की, ‘शिवतांडव’ नाटकामधून शिवाजी महाराजांचे चौफेर व्यक्तिमत्व, त्यांचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
या नाटकात ३७ कलाकार आहेत. प्रताप गंगावणे यांनी नाटकाचे लेखन केले आहे. अडीचशेहून अधिक कलाकारांच्या ऑडिशनमधून कलाकारांची निवड करण्यात आली आहे. संगीतकार रोहित नागभिडे यांचे संगीत, नेपथ्य बाबा पार्सेकर यांचे असून सूत्रधार राजू बंग, भैरवनाथ शेरखाने आहेत. भव्य नेपथ्य, उत्तम संगीत, काळजाचा ठाव घेणारी गाणी आणि दमदार संवाद यामधून हे नाटक रसिकांची मने जिंकेल.
नाटकाचे निर्माते भाऊसाहेब भोईर म्हणाले की, चित्रपट, नाटकाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा मोरया थिएटर्सचा नेहमी प्रयत्न असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आजच्या पिढीला दाखवण्यासाठी ‘शिवतांडव’ ची निर्मिती केली आहे. मोरया गोसावींच्या साक्षीने आज नाटकाच्या संहितेचे पूजन करण्यात आले आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग येत्या २८ मार्च रोजी चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात होणार आहे.