- शिक्षक पालकांसह विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
- ऑनलाइन अभ्यासाचा आगळा वेगळा प्रयोग
खालापूर – खोपोली येथील शालोम एज्युकेशन सेंटर संचालित सोफिया मतिमंद मुलांची शाळा येथील मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी “वर्कफ्रॉम होम’ बनवलेले आकर्षक आणि रंगीबेरंगी पणत्या व कंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
ऑगस्ट 2005 पासून खालापूर तालुक्यामध्ये यशस्वीपणे कार्यरत असणारी एकमेव शाळा असून, शाळेच्या उपाध्यक्षा रूपा मजेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली येथे मतिमंद मुलांची शाळा सुरू आहे. यामध्ये 30 विद्यार्थी शिक्षण व प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात या मुलांच्या शाळा बंद असताना सुद्धा या मुलांनी “वर्क फ्रॉमहोम’ हा उपक्रम हाती घेत शाळेच्या मुख्याध्यापिका शुभा पाटणकर यांनी स्वतः ऑनलाइन मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना मागील वर्षीप्रमाणे मुलांना प्रोत्साहन देऊन विविध वस्तू तसेच अन्य वस्तूंची निर्मिती करून घेत आहेत. तसेच शाळेतील शिक्षक साक्षी पवार, मंजू बोडके, कर्मचारी दुर्गा दबडे, रुचिता सावंत, जयकुमार म्हात्रे या सर्वांच्या मदतीने या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.
या शाळेतील मुले वर्षभर दिवाळीचे व अन्य साहित्य बनवत असतात. पेपर डिश, अगरबत्ती, फाइल्स, प्रेझेंट पाकीट, छोट्या-मोठ्या आकाश कंदील, राखी, लिफाफे, उटणे, फुले, वर्तमानपत्राच्या बॅग, मेणबत्ती, पणत्या, बुके, अशा अनेक वस्तू विद्यार्थी बनवत असतात. घरात बसूनच मुलांची कलाकौशल्यासह बनवलेल्या नावीन्यपूर्ण वस्तू विक्रीसाठी जाणार आहेत.
मात्र करोना संकटाच्या काळात आलेल्या आर्थिक परिस्थितीवर कशी मात करावी याचा आदर्श या मतिमंद मुलांनी सर्वांना दिला आहे. खोपोलीकरांनी या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती या विकत घेऊन त्याचे एक प्रकारे कौतुक करावे जेणे करून त्यांना प्रोत्साहन मिळेल.