पिंपरी, (प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाकडून परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक संस्था, हॉटेल व्यावसायिक, मॉल असोसिएशन, लघुउद्योग संघटना यांनी आपल्या कामगारांना मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी.
तसेच सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे आणि शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, त्याकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहेत.या बाबत आयोजित केलेल्या बैठकीत आयुक्त सिंह बोलत होते.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे संदीप बेलसरे, जयंत कड, पिंपरी चिंचवड औद्योगिक फेडरेशनचे गोविंद पानसरे, वसंत परिळे, जगदीश जोशी, मधुकर गायकवाड, शहरातील विविध सामाजिक, पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे संजय गोरड, संजीवन सांगळे, पुणे जिल्हा हौसिंग सोसायटी फेडरेशनचे आशिष सातकर, राहुल मोकाशी, घरकुल अपंग सहायता संस्थेचे संगीता जोशी, दत्तात्रय भोसले, सीआयआयचे प्रसाद बच्चन, ओमकार भोसेकर, रोहित रासकर, एलप्रो सिटी स्क्वेअरचे निशांत कान्सल, चिंतन केत, फिनिक्स मॉलचे अमित अंबुरे आदी उपस्थित होते.
गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, चेअरमन, सेक्रेटरी यांनीही सोसायटीमधील सर्व नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि विविध उपक्रम राबवावेत. शहरात अनेक मोठे मॉल आहेत. या मॉलच्या चालकांनी किंवा असोसिएशनच्या सदस्यांनी महापालिकेच्या स्मार्ट सारथी टीमच्या मदतीने मॉलमध्ये मतदान जगजागृती करण्यासाठी विविध समाजमाध्यमांचा वापर करावा.
तसेच पथनाट्य, भित्तीपत्रके, सेल्फी पॉईंट्सच्या माध्यमातून जनजागृती करावी. मतदानाचा हक्क बजावून आलेल्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी मॉल्स, थिएटर, हॉटेल्समध्ये सवलत देण्याबाबत संबंधितांनी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहनही आयुक्त सिंह यांनी केले.
तसेच शहरातील महानगरपालिकेच्या तसेच खासगी शाळांतील विद्यार्थ्यांमार्फत पालकांची मतदान करण्याबाबतची संकल्प पत्र भरून घेण्याबाबत शिक्षण विभागामार्फत कार्यवाही करावी तसेच महाविद्यालयीन युवकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदान करावे, याबाबतही आयुक्त सिंह यांनी आवाहन केले.
– घंटा गाड्यांवर मतदान जागृतीबद्दल जिंगल्स वाजविणार
– महाविद्यालय व मॉल्सच्याठिकाणी विविध उपक्रम
– मतदान जनजागृती उपक्रमात स्वयंसेवी संस्थांना सहभागी करणार
– बचत गटांना सहभाग वाढविणार
– दिव्यांग बांधवांसाठी मतदान केंद्रांमध्ये व्हीलचेअर्सची व्यवस्था